दापोली : मांगल्याची पखरण करत कालच घराघरांत विराजमान झालेल्या लाडक्या गजाननाला आज अत्यंत भक्तिमय आणि उत्साही वातावरणात निरोप देण्यात आला. दापोली तालुक्यातील बोरिवली-आडिवाडी गावातील मानाच्या देपोलकर, रेवाळे आणि बैकर परिवाराच्या दीड दिवसांच्या श्रींचे आज सुप्रसिद्ध पंचनदी धरणात मोठ्या थाटामाटात आणि वाजत-गाजत विसर्जन करण्यात आले.
गावात उत्सवाचा महापूर, ढोल-ताशांचा गजर!
काल प्राणप्रतिष्ठापनेपासूनच देपोलकर, रेवाळे आणि बैकर परिवाराच्या अंगणात आनंदोत्सव फुलला होता. दीड दिवसांचा पाहुणचार आटोपून आज संध्याकाळी जेव्हा बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली, तेव्हा संपूर्ण आडिवाडी गाव बाप्पाच्या भक्तीत रंगून गेले. गुलाल, फुलांची उधळण आणि ‘एक दोन तीन चार, गणपतीचा जयजयकार’च्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता.
पंचनदी धरणावर नयनरम्य सोहळा
गावातील पारंपरिक मार्गाने निघालेली मिरवणूक पंचनदी धरणाच्या परिसरात पोहोचली. धरण क्षेत्रात पाण्याच्या खळखळाटात आणि भाविकांच्या जल्लोषात आरती करण्यात आली. लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनीच बाप्पाला पुढच्या वर्षी लवकर येण्याचे साकडे घातले. दोन्ही हात जोडून, अश्रूंच्या आणि आनंदाच्या साक्षीनं तिन्ही परिवारांनी लाडक्या विघ्नहर्त्याला निरोप दिला.
गावातील ग्रामस्थ, नातेवाईक आणि तरुण मंडळाच्या अभूतपूर्व उपस्थितीमुळे हा विसर्जन सोहळा संपूर्ण तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे.
दापोलीत दीड दिवसाच्या बाप्पाचे श्रद्धापूर्वक विसर्जन…
