चिपळूण : श्री गौरी-गणपती उत्सवानिमित्त प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (MSRTC) चिपळूण आगाराने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १९ सप्टेंबर २०२६ ते २२ सप्टेंबर २०२६ या कालावधीत चिपळूण आगारातून सुटणाऱ्या काही जादा व नियमित बससेवांच्या मार्गात तात्पुरता बदल करण्यात आला आहे.
या कालावधीत मुंबई, बोरीवली, ठाणे, कल्याण, भांडुप, डोंबिवली, नालासोपारा, चिंचवड, स्वारगेट, बदलापूर आणि पनवेल या मार्गांवरील जादा तसेच नियमित बससेवा चिपळूण मध्यवर्ती बसस्थानकातून न सुटता शिवाजीनगर बसस्थानक (हायवे) येथून सोडण्यात येणार आहेत.
प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी तसेच गणेशोत्सव काळातील वाहतूक कोंडी नियंत्रित करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे संबंधित मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी बस पकडण्यासाठी शिवाजीनगर बसस्थानक (हायवे) येथे जाण्याचे आवाहन चिपळूण आगार व्यवस्थापकांकडून करण्यात आले आहे.
