मंडणगड : मंडणगड तालुका कुणबी सेवा संघाच्या वतीने आयोजित कुणबी भवन सार्वजनिक गणेशोत्सव २०२६ अंतर्गत २० सप्टेंबर २०२६ रोजी शहरातील कुणबी भवन येथे पारंपरिक कलगीतुऱ्याच्या संगीतामय सामन्याचे आयोजन करण्यात आले. शास्त्र आणि पुराणांच्या आधारे सवाल-जवाबाच्या माध्यमातून रंगलेल्या या पारंपरिक जुगलबंदीला उपस्थित रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.

या कार्यक्रमात शाहीर सचिन कदम यांच्या ‘शक्तीवाले’ आणि शाहीर ऋषिकेश बिरवाडकर यांच्या ‘तुरेवाले’ या दोन कलापथकांनी सहभाग घेतला. दोन्ही पथकांनी आपल्या वैशिष्ट्यपूर्ण गायनशैलीतून, सवाल-जवाबातून तसेच पारंपरिक कलगीतुऱ्याच्या माध्यमातून कार्यक्रमात रंगत आणली. मधुर स्वर, प्रभावी सादरीकरण आणि उत्स्फूर्त जुगलबंदीमुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.

‘मधुर स्वरांचा राजा’ म्हणून परिचित असलेल्या शाहीर सचिन कदम यांच्या शक्तीवाले पथकाने दमदार सादरीकरण केले. तर ‘मधुर स्वरांचा नवांकुर’ अशी ओळख असलेल्या शाहीर ऋषिकेश बिरवाडकर यांच्या तुरेवाले पथकानेही आपल्या कलाविष्कारातून रसिकांची मने जिंकली.

कलगीतुरा ही कोकणच्या लोकजीवनाशी जोडलेली पारंपरिक लोककला आहे. कोकणची लोककला, परंपरेचा वारसा आणि या कलेचे जतन या भावनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने नव्या पिढीसमोर या पारंपरिक कलाप्रकाराचे प्रभावी सादरीकरण करण्यात आले.

कार्यक्रमाला गणेशभक्त, कलाप्रेमी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमास समाजनेते भाई पोस्टुरे आणि निवृत्त पोलीस अधिकारी रमेश घडवले यांची विशेष उपस्थिती लाभली.

कुणबी सेवा संघाचे पदाधिकारी विजय ऐनेकर, रघुनाथ पोस्टुरे, सचिन माळी, सुरेश पोस्टुरे तसेच कार्यकर्त्यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मेहनत घेतली.