चिपळूण : लाडक्या गणरायाच्या आगमनाने अवघे चिपळूण गणेशमय झाले असतानाच अनंत चतुर्दशीच्या म्हणजेच दहा दिवसाच्या बाप्पाला शुक्रवारी भक्तिमय आणि भावूक वातावरणात निरोप देण्यात आला. १४ सार्वजनिक तर ३९६५ खाजगी गणरायांना निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या! च्या जयघोषाने शहरातील विविध भाग दुमदुमून गेले. ढोल-ताशांचा गजर, पारंपरिक वाद्यांचा निनाद आणि गुलालाची उधळण करत गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला.
गणरायाच्या विसर्जनासाठी दुपारनंतर भाविकांची लगबग सुरू झाली होती. आकर्षक सजावट केलेल्या वाहनांमधून तसेच काही भाविकांनी गणेशमूर्ती हातात घेऊन विसर्जनस्थळांकडे प्रस्थान केले. अनेक घरांमध्ये विसर्जनापूर्वी श्रींची विधिवत पूजा, आरती आणि नैवेद्य अर्पण करण्यात आला. बाप्पा, आमच्या कुटुंबावर सदैव कृपादृष्टी ठेवावी आणि पुढील वर्षी पुन्हा सुख-समृद्धी घेऊन यावे, अशी भावपूर्ण प्रार्थना करण्यात आली.
शहरातील बाजारपूल, खंड बावशेवाडी नदी, बहादूरशेख नाक्याजवळील वाशिष्ठी नदी तसेच पाग नदीकिनारी, गांधारेश्वर येथे असलेल्या विसर्जनस्थळांवर सायंकाळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. काही ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने आरती करून बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाच्या वेळी गणपती बाप्पा मोरयाचा जयघोष आणि ढोल-ताशांच्या गजरामुळे परिसरातील वातावरण भक्तिमय झाले होते.
