दापोली :- जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब क्रीडा स्पर्धेत दापोलीतील विद्यार्थ्यांनी आपल्या उत्कृष्ट क्रीडा कौशल्याचे दर्शन घडवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. विविध वयोगटांत विद्यार्थ्यांनी चमकदार कामगिरी करत तब्बल 9 विद्यार्थ्यांनी विभागीय स्पर्धेसाठी आपली निवड निश्चित केली आहे. या यशामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षक तसेच प्रशिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत १४, १७ आणि १९ वर्षे वयोगटात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत शंभूराजे ज्ञानदेव पवार याने १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला. स्वरा संतोष परब हिनेही १४ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक पटकावला. नील अभिजीत मोहिते याने तृतीय क्रमांक, तर सई ज्ञानेश्वर जगताप हिने चतुर्थ क्रमांक मिळवून उल्लेखनीय कामगिरी केली.
१७ वर्षे वयोगटात सर्वज्ञ सुयोग घाग याने द्वितीय क्रमांक मिळवला, तर स्पृहा ज्ञानेश फाटक हिने प्रथम क्रमांक पटकावला. तसेच १९ वर्षे वयोगटात पायल दत्ता पवार हिने प्रथम क्रमांक मिळवत उत्कृष्ट कामगिरी केली. तीर्था संजय कारंडे हिने द्वितीय क्रमांक, तर श्रीराज अनंत रेवाळे याने तृतीय क्रमांक मिळवला.
या सर्व विद्यार्थ्यांच्या उल्लेखनीय कामगिरीमुळे त्यांची विभागीय शालेय मल्लखांब स्पर्धेसाठी निवड झाली आहे. जिल्हास्तरावर विविध वयोगटांत मिळवलेले हे यश विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे, जिद्दीचे आणि नियमित सरावाचे फलित असल्याचे सांगण्यात येत आहे.
या विद्यार्थ्यांना विजय भुवड सर, गणेश भुवड सर, पंकज भुवड सर आणि सिद्धांत भुवड सर यांनी सातत्याने प्रशिक्षण व मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या शारीरिक क्षमतेसोबतच मल्लखांबातील तंत्र, संतुलन, चपळता आणि आत्मविश्वास वाढविण्यासाठी प्रशिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळे विद्यार्थ्यांना जिल्हास्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करता आली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे प्रशिक्षकांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन, पालकांचे प्रोत्साहन आणि विद्यार्थ्यांचा नियमित सराव यांचा महत्त्वपूर्ण वाटा आहे. जिल्हास्तरीय स्पर्धेत नाव गाजवत आता विभागीय स्तरावर खेळण्याची संधी मिळाल्याने सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.
जिल्हास्तरीय शालेय मल्लखांब स्पर्धेत विद्यार्थ्यांचे घवघवीत यश; ९ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
