खालापूर : तालुक्यातील मुंबई-पुणे जुन्या महामार्गालगत असलेल्या कलोते-रयती गावाकडे जाणारा रस्ता सध्या कचऱ्याच्या विळख्यात सापडला आहे. रस्त्याच्या दुतर्फा हॉटेल, रिसॉर्ट व इतर आस्थापनांमधील अन्नमिश्रित तसेच कुजलेला कचरा टाकला जात असल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. तसेच रयती ग्रामपंचायतीचा टाकाऊ कचरा येथे टाकला जात असल्याची नागरिकांची तक्रार आहे.
कलोते-रयती मार्गावरून रयती गावासह विविध आदिवासी पाडे, फार्महाऊस, व्यसनमुक्ती केंद्रे तसेच धार्मिक संस्थांकडे नागरिकांची नियमित ये-जा असते. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा मोठ्या प्रमाणात कचरा साचल्याने नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
कुजलेल्या कचऱ्याच्या तीव्र दुर्गंधीमुळे श्वास घेण्यासही त्रास होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही आदिवासी नागरिकांना या मार्गावरून प्रवास करताना त्रास होऊन गुदमरल्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याचेही स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.
अन्नमिश्रित कुजलेल्या कचऱ्यामुळे भटकी कुत्री, साप तसेच जंगली प्राण्यांचा वावर वाढला असल्याची तक्रार आहे. डोंगरालगत आणि काही प्रमाणात दुर्गम भागातून जाणारा हा रस्ता दिवसा पायी जाणाऱ्या नागरिकांसाठीही असुरक्षित वाटत असून, रात्रीच्या वेळी या मार्गावरून प्रवास करणे अधिक धोकादायक ठरत असल्याची भावना स्थानिकांनी व्यक्त केली आहे.
या गंभीर समस्येची महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने, संबंधित रस्ते प्राधिकरणाने तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींनी तातडीने दखल घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. रस्त्याच्या दुतर्फा कचरा टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, नियमित स्वच्छता व्यवस्था करावी आणि कलोते-रयती मार्ग कायमस्वरूपी कचरामुक्त, स्वच्छ व सुरक्षित करावा, अशी कळकळीची मागणी रयतीसह परिसरातील आदिवासी पाड्यांतील नागरिकांनी केली आहे.
