चिपळूण : निवडणूक आयोगाच्या मनमानी कारभाराविरोधात तसेच महाविकास आघाडीला कथितरीत्या लक्ष्य करून लोकशाही मूल्यांना धक्का पोहोचविणाऱ्या निर्णयांविरोधात चिपळूण येथे उद्या ७ ऑक्टोबर रोजी शिवसेना नेते, आमदार श्री. भास्करराव जाधव यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या महामोर्चात नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

“लोकशाहीचा गळा घोटणारे हे अन्याय आपण मुकाटपणे किती दिवस सहन करणार?” असा सवाल उपस्थित करत या महामोर्चाच्या माध्यमातून निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमितता, मनमानी आणि लोकशाहीविरोधी कारभाराविरोधात आवाज उठविण्यात येणार आहे.

या महामोर्चाचे प्रमुख नेतृत्व शिवसेना नेते तथा आमदार भास्करराव जाधव करणार आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली विरोधी पक्षातील विविध नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच लोकशाहीवादी नागरिक या आंदोलनात सहभागी होणार आहेत.

सकाळी १० वाजता शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून या मोर्चाला सुरुवात होईल. याच ठिकाणी जाहीर सभा होऊन चिंचनाका मार्गे प्रांत कार्यालयावर मोर्चा जाईल. प्रांताधिकाऱ्यांना तिथे निवेदन दिले जाणार आहे.