खेड :- तालुक्यातील आंबवली गावातील पंचक्रोशी न्यू इंग्लिश स्कूल कमिटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स, आंबवली यांच्या वतीने सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘महिला सबलीकरण’ या विषयावर जनजागृतीपर पथनाट्य मंगळवार, दि. ६ ऑक्टोबर २०२६ रोजी आंबवली चौकात पथनाट्य सादर करण्यात आले.
समाजामध्ये महिला सबलीकरणाबाबत जनजागृती निर्माण करणे, महिलांना त्यांच्या हक्कांची जाणीव करून देणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये स्त्री-पुरुष समानतेची मूल्ये रुजविणे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश होता. विद्यालयातील इयत्ता अकरावीच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पथनाट्यात उत्स्फूर्त सहभाग घेत प्रभावीपणे सामाजिक संदेश मांडला.
या उपक्रमासाठी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका ॲड. सौ. यादव यांचे मार्गदर्शन लाभले. विद्यालयाचे प्राध्यापक श्री. नंदकुमार गावडे आणि हायस्कूलच्या शिक्षिका कु. सृष्टी धारिया यांनी संयोजनाची जबाबदारी सांभाळली. पथनाट्याची संकल्पना व तयारी करण्यासाठी विद्यालयाच्या प्राध्यापिका श्रीमती कदम यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांतून हा उपक्रम उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरीत्या पार पडला. पथनाट्याच्या माध्यमातून महिला सक्षमीकरण, समानता आणि सामाजिक जबाबदारीचा प्रभावी संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला. या उपक्रमाचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले.