मुंबई : साखर उद्योगातील कामगारांच्या विविध प्रलंबित मागण्यांवर सकारात्मक विचार करून त्यावर मार्ग काढण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सहकार व कामगार विभागाची, सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी तसेच कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संयुक्त बैठक लवकरात लवकर आयोजित करण्यात येईल, असे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी बैठकीत सांगितले.

महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ, अहमदनगर आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळ, पुणे या संघटनांनी साखर उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्यांबाबत शासनाकडे सादर केलेल्या निवेदनाच्या अनुषंगाने कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांवर चर्चा करण्यात आली.

या बैठकीस आमदार विनय कोरे, कामगार विभागाचे उपसचिव (कामगार-२) स्वप्नील कापडणीस, अतिरिक्त कामगार आयुक्त भास्कर मामोरडे तसेच महाराष्ट्र राज्य साखर कामगार महासंघ आणि महाराष्ट्र राज्य साखर कामगार प्रतिनिधी मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

साखर कामगार संघटनांनी सादर केलेल्या निवेदनात कामगारांचे थकीत वेतन अदा करणे, बंद व आजारी साखर कारखाने सुरू करणे, कामगारांचे पुनर्वसन, कायम व कंत्राटी कामगारांच्या वेतनासंबंधी प्रश्न मार्गी लावणे तसेच साखर उद्योगातील कामगारांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र औद्योगिक संबंध अधिनियम, १९४६ पूर्ववत लागू करण्याची मागणीही संघटनांनी केली आहे.

या मागण्यांपैकी काही विषय सहकार विभाग, साखर आयुक्तालय आणि कामगार आयुक्तालयाच्या कार्यक्षेत्राशी संबंधित आहेत. त्यामुळे संबंधित विभागांनी आपापल्या अधिकारक्षेत्रातील प्रश्नांचा आढावा घेऊन समन्वयाने कार्यवाही करण्याबाबत यांची चर्चा करण्यात आली. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात येणाऱ्या आगामी बैठकीत संबंधित विभाग, सहकारी साखर कारखान्यांचे प्रतिनिधी आणि कामगार संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या सहभागातून या प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार आहे.

संप तूर्तास स्थगित
साखर उद्योगातील कामगारांच्या विविध मागण्यांच्या अनुषंगाने दि. २२ ऑक्टोबर २०२६ पासून पुकारलेल्या बेमुदत संपात राज्यातील सुमारे सात सहकारी आणि तीन खासगी साखर कारखान्यांतील कामगार सहभागी झाले होते. कामगारांच्या मागण्यांवर सकारात्मक चर्चा करून त्यावर मार्ग काढण्यासाठी लवकरच उच्चस्तरीय बैठक आयोजित करण्याचे आश्वासन मिळाल्यानंतर साखर कामगार महासंघाच्या वतीने संप तूर्त स्थगित केल्याचे घोषित करण्यात आले.