लोटे : फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री (FICCI) यांच्या वतीने रसायने आणि पेट्रोकेमिकल्स उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी व योगदान देणाऱ्या कंपन्यांचा गौरव करण्यासाठी ‘केमिकल्स अँड पेट्रोकेमिकल्स इंडस्ट्री अवॉर्ड्स २०२६’ या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार सोहळ्यात घरडा केमिकल्स लिमिटेड, लोटे या कंपनीला दोन प्रतिष्ठित पुरस्कारांसाठी निवडण्यात आले. कंपनीने कॉर्पोरेट सामाजिक उत्तरदायित्व (CSR) अंतर्गत राबविलेल्या विविध समाजोपयोगी उपक्रमांसाठी ‘उत्कृष्ट सामाजिक योगदान (CSR) पुरस्कार २०२६’, तर कंपनीमध्ये आधुनिक डिजिटल प्रणालींचा प्रभावी वापर केल्याबद्दल ‘डिजी टेक फ्रंट रनर ऑफ द इयर पुरस्कार २०२६’ प्रदान करून गौरविण्यात आले.
घरडा केमिकल्स लिमिटेडने आपल्या CSR उपक्रमांतर्गत रत्नागिरी जिल्ह्यातील खेड, चिपळूण, गुहागर आणि दापोली तालुक्यांतील ग्रामीण भागाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध सामाजिक प्रकल्प राबविले आहेत. यामध्ये शैक्षणिक उपक्रम, पाणीपुरवठा योजना, महिला सक्षमीकरण, डिजिटल स्कूल प्रकल्प, विज्ञान प्रयोगशाळा, शाळा दुरुस्ती, शालेय स्वच्छतागृहांची उभारणी, दिव्यांग विद्यार्थी व व्यक्तींसाठी तपासणी आणि सहाय्यभूत साहित्य वाटप शिबिरे, कृषी व ग्रामीण विकास प्रकल्प, वृक्षारोपण तसेच पर्यावरण संवर्धनाच्या विविध उपक्रमांचा समावेश आहे.
कंपनीमार्फत राबविण्यात येणारे हे प्रकल्प ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यास, विद्यार्थ्यांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्यास आणि स्थानिक समुदायाच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्यास महत्त्वपूर्ण योगदान देत आहेत.
कंपनीच्या या विविध सामाजिक उपक्रमांचे राष्ट्रीय स्तरावरील व्यासपीठावर सादरीकरण करण्यात आले. या पुरस्कार प्रक्रियेत देशातील अनेक नामांकित रसायने व पेट्रोकेमिकल्स कंपन्यांनी सहभाग घेतला होता. सामाजिक विकासासाठी केलेले सातत्यपूर्ण कार्य, प्रकल्पांच्या अंमलबजावणीतील पारदर्शकता, नियोजनबद्ध कार्यपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर या वैशिष्ट्यांमुळे घरडा केमिकल्स लिमिटेडने आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली. या पुरस्कारांमुळे कंपनीची सामाजिक बांधिलकी, समाजाच्या शाश्वत विकासाप्रती असलेला दृढनिश्चय आणि उत्कृष्ट कार्यपद्धती अधोरेखित झाली आहे.
या पुरस्कारांचे वितरण २२ ऑक्टोबर २०२६ रोजी मुंबई येथील पंचतारांकित हॉटेल ITC मराठा येथे आयोजित समारंभात करण्यात आले. या प्रसंगी भारत सरकारच्या रसायने व पेट्रोकेमिकल्स विभागाचे सचिव, उद्योग क्षेत्रातील वरिष्ठ अधिकारी तसेच देशातील विविध कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
राष्ट्रीय स्तरावरील दोन प्रतिष्ठित पुरस्कारांनी सन्मानित झाल्यामुळे घरडा केमिकल्स लिमिटेडच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण आहे. कंपनीच्या या यशामुळे सामाजिक उत्तरदायित्वाच्या क्षेत्रातील तिच्या योगदानाला राष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, भविष्यातही समाजोपयोगी आणि शाश्वत विकासाच्या उपक्रमांना अधिक बळ मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.