महाड (मनोज खांबे) : आधी पावसाने पाठ फिरवली, आता ऐन भात कापणीच्या हंगामात मुसळधार पावसाने घाव घातला! निसर्गाच्या या लहरीपणामुळे महाड तालुक्यातील शेतकऱ्यांवर संकटांची कुऱ्हाड कोसळली आहे. शनिवारी पहाटे झालेल्या मुसळधार पावसाने शेतात कापून ठेवलेली भातशेती पूर्णपणे भिजून गेली असून, काही प्रमाणात कापणी करून जमा केलेले भातही पावसाच्या पाण्यात भिजल्याने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. वर्षभर घाम गाळून, काबाडकष्ट करून पिकवलेले पीक डोळ्यांदेखत उद्ध्वस्त होत असल्याने बळीराजा अक्षरशः हतबल झाला आहे.
यंदा पाऊस लवकर ओसरल्याने कोकणातील भातशेतीला मोठा फटका बसला. पाण्याअभावी भातपिकाची वाढ खुंटली, अनेक ठिकाणी पीक करपले, तर काही ठिकाणी उत्पादनात मोठी घट झाली. अशा परिस्थितीत उरलेसुरले पीक पदरात पडेल, या आशेने शेतकऱ्यांनी भात कापणी सुरू केली होती. मात्र, शनिवारी पहाटे कोसळलेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या या आशेवरही पाणी फेरले.
