रोहा ( प्रतिनिधी ) : तालुक्यातील आंबेवाडी ते निवी कालव्याची साफ सफाई व दुरुस्तीच्या कामांसाठी आतापर्यंत शासनाने करोडो रुपयांचा खर्च केला. पाण्यासारखा खर्च करुन देखील शेतकऱ्यांना अद्याप पाण्याची प्रतीक्षा करावी लागत असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर कालवा पुन्हा सुरु व्हावे यासाठी सतत शासन दरबारी लढा देणाऱ्या बळीराजा फाऊंडेशन रोहा या संस्थेने पाटबंधारे विभागाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत जाब विचारण्याचा इशारा दिला आहे.
बहुचर्चीत आंबेवाडी ते निवी कालव्याची कामे अंशतः पूर्ण झाली असून निवीपर्यंत पाणी सुरळीत पोहोचेल असा दावा बळीराजा फाउंडेशनच्यावतीने यापूर्वी करण्यात आला होता.मात्र प्रत्यक्षात कालव्याची साफसफाई अद्याप सुरू झालेली नाही.मार्च महिना सुरू झाला तरी पाणी सोडण्याबाबत ठोस नियोजन दिसत नसल्याने शेतकरी संभ्रमात आहेत.तर दुसरीकडे उर्वरित वाशी,लांढर,तळाघर, निवी हद्दीतील कालव्याची व पोट कालव्याची कामे देखील धिम्या गतीने उरकण्यात आली आहेत. माहिती जाणून घेण्यासाठी संबधित अधिकारी वर्गाकडे संपर्क साधले असता या विषयी टोळवाटोळवी केली जात असल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे सूर उमटत आहेत.
कार्यकारी अभियंतांकडून वारंवार “नियोजन करू, चर्चा करू,माहिती घेतो” अशा प्रतिक्रिया मिळत असल्या तरी प्रत्यक्ष कामांना गती नसल्याचा आरोप फाऊंडेशनने केला आहे. कालवा साफसफाईसाठी यंत्रसामग्री येणार असल्याचे सांगितले जात असले तरी कामाची प्रत्यक्ष सुरुवात झालेली नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान आंबेवाडी-निवी कालव्यालाच्या साफ सफाईच्या कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही. कालवा दुरुस्तीचे कामे अशंत: पूर्णत्वास गेलीत तरीही पाणी सोडण्याचा नियोजन नाही. पाट बंधारे विभागाचा नियोजन शून्य कारभार असल्याचा आरोप बळीराजा फाउंडेशन संस्थेचे अध्यक्ष विठ्ठल मोरे यांनी केला आहे.

कालव्याच्या कामावर आत्ता पर्यंत करोडो रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. याची जाणीव अधिकाऱ्यांना का नाही? पाणी सोडण्याचा उद्देश पूर्ण का केला जात नाही असा सवाल फाउंडेशनचे ऍड.दीपक भगत यांनी उपस्थित केला आहे.