पेण : रायगडच्या पेण तालुक्यातील बळवली, आंबिवली, बेलवडे, मुंगोशी, दवणसर, वळक परिसरांतील शेतीला लागून वाहणाऱ्या नदी पात्रात सिडको अंतर्गत मेघा इंजिनिअरिंग कंपनीने सुरु केलेल्या कामामुळे केमिकलयुक्त, गंधक युक्त, क्षारयुक्त सांडपाणी सोडल्यामुळे शेती, भाजीपाला, मासे व जनजीवनाचे तसेच पशु, जनावरांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक गावात व आदिवासी वाड्यातील पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत बंद झालेले आहेत. अनेक वेळा तक्रार करुनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नसल्याने बळवली पंचक्रोशीतील सर्व शेतकरी महिला व ग्रामस्थांनी न्यायासाठी तहसीलदार कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषण सुरू केले आहे.

नदीत सोडले जाणारे दूषित पाणी तात्काळ बंद करावे अन्यथा शुध्दीकरण करुन मोठ्या पाईपलाईन व्दारे खाडीत सोडण्यात यावे.स्थानिक शेतकऱ्यांना विश्वासात न घेता काम करणाऱ्या दोषी मेघा इंजिनियरिंग कंपनी व संबंधितांवर कडक कारवाई करा.तसेच नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचा तात्काळ पंचनामा करा आणि त्यांना तात्काळ योग्य नुकसान भरपाई द्या त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याच्या भीषण टंचाईवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी उपाययोजना म्हणून जवळील हेटवणे धरणातून जाणाऱ्या पाईपलाईन मधून संबंधित गावांना, आदिवासी बांधवांना पाईपलाईन व्दारे पाणीपुरवठा करावा अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी केली आहे.

पाणी हे जीवन आहे परंतु आमचे पाणी यांनी हिसकावून घेतले आहे.आधी पाण्याची व्यवस्था करा नंतर काम सुरू करा. सिडकोने हा प्रकल्प आणला असल्याने सर्व जबाबदारी सिडकोची आहे. जर तुम्ही गोरगरिबांचे हालहाल करीत असाल तर आम्ही शांत बसणार नाही यापुढे सदरचे आंदोलन अधिक तीव्र करू असा इशारा सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे यांनी दिला आहे.

यावेळी सामाजिक कार्यकर्ते हरीश बेकावडे, बरीराम पाटील, रमेश पाटील, अमित म्हात्रे, समाधान पाटील, चंद्रकांत पाटील, विनोद गोळे, मदन पाटील, भरत पाटील, शैलेश पाटील, अरुण पाटील, विठोबा पाटील, विठाबाई पाटील मंगल पाटील, वसंत पाटील, रवींद्र पाटील, चंद्रकांत नाईक, महादू गोळे भाई पाटील, ललित पाटील आणि इतर शेतकरी या उपोषणात सहभागी झाले आहेत.