मुंबई : राऊतांनी उद्धव ठाकरे यांना भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी देण्यास भाग पाडले. भोंदूबाबावर ठाकरे सरकारची मेहेरनजर असल्याचा आरोप करत भाजपाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी भोंदूबाबाच्या ‘श्री शिवनिका संस्थान’ला शेतकऱ्यांच्या हक्काचे पाणी वळवून 39 लाख लिटर पाणीपुरवठा करण्यासाठी उद्धव ठाकरे यांना भाग पाडले. नाशिकचे संपर्कप्रमुख असलेल्या राऊतांच्या मेहेरबानीमुळेच 31 जुलै 2020 रोजी भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणी आरक्षित करण्याचा शासननिर्णय घेण्यात आल्याचा हल्लाबोल भारतीय जनता पक्षाचे मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मविआ सरकारच्या कारकीर्दीत भोंदूबाबा मोकाट

तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मविआ सरकार 2019 मध्ये सत्तेत आले. भोंदूबाबाची काळी कृत्ये 2003 पासून सुरू होती, हे माहीत असूनही या भोंदूबाबाच्या आश्रमाला पाणीपुरवठा करण्यात आला. 2003 ते 2019 दरम्यान काँग्रेस सरकार आणि नंतर मविआ सरकार सत्तेत असताना हा भोंदू मोकाट होता. त्यावेळी भोंदूबाबावर कारवाई का केली नाही, असा परखड सवाल श्री. बन यांनी केला. याउलट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यूहरचना रचून, कोणालाही ताकास तूर लागू न देता भोंदूबाबाच्या कारनाम्यांचे पुरावे गोळा करून त्याच्या मुसक्या आवळल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सक्षम नेतृत्वामुळे महाराष्ट्रात कायद्याचे राज्य आहे. मविआ सरकार असताना मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले होते. रोज 100 कोटींची वसुली करणे, सरकारविरोधी कार्टून फॉरवर्ड केले म्हणून नौदल अधिकाऱ्याला चोप देणे, कोविड काळात कोट्यवधींचा घोटाळा, पत्रकारांची धरपकड करणे, अशी कृत्ये करून राज्याचे वाटोळे करण्याचे पाप उद्धव ठाकरे आणि राऊतांनी केले, असा प्रहार श्री. बन यांनी केला.

राऊतांना जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी फक्त भाजपाच दिसतो

राऊतांचे डोके फिरले असून त्यांना प्रत्येक गोष्टीत भाजपाचा दोष दिसतो. प्रत्येक काळ्या कृत्याचा राऊत भाजपाशी संबंध जोडतात. भोंदूबाबा भाजपाचा प्रचारक होता, असे बरळून राऊतांनी आपण भ्रमिष्ट झाल्याचे सिद्ध केले, अशी टीका श्री. बन यांनी केली. हिंदू धर्माचा प्रचार करणाऱ्या आध्यात्मिक संतांबद्दल भाजपाला आदर असल्यामुळे भाजपा आध्यात्मिक संतांची आघाडी नक्कीच उभारतो. मात्र राऊतांना हिंदू धर्म, त्याचे साधुसंत, महात्मे यांच्याबद्दल आदर वाटत नसून त्यांना मौलवींची आघाडी व संघटना उभारण्यात अधिक स्वारस्य असल्याचा बोचरा टोमणा श्री. बन यांनी मारला.

“भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी,” या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार भाजपाला साधूसंतांबद्दल आदर असून त्यांचे आशीर्वाद मोलाचे वाटतात. मात्र त्याचवेळी भाजपा नाठाळांना धडा शिकवतो, हेही सर्वांना दिसून आले, असे श्री. बन म्हणाले.

पश्चिम आशियातील वाढता संघर्ष आणि युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीला राहुल गांधी का उपस्थित राहणार नाहीत, याचे उत्तर काँग्रेस आणि राहुल यांचे गुलाम झालेल्या राऊतांनी द्यावे, असे आव्हान श्री. बन यांनी दिले. सर्वपक्षीय महत्त्वाची बैठक सोडून राहुल गांधी केरळला जाण्यात धन्यता मानतात. त्यांना देशाचे प्रश्न महत्त्वाचे वाटत नाहीत, असे श्री. बन यांनी नमूद केले.

संजय राऊत यांनी थेट इराणसंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फुकाचे सल्ले देण्यापेक्षा आपला पक्ष साधा उरण्यापुरताही शिल्लक राहिला नाही, याकडे पाहावे. देश पंतप्रधानांच्या नेतृत्वात पुढे जात आहे; पण उबाठा गटाची झालेली वाताहत सुधारण्याची गरज आहे, असा खोचक सल्लाही श्री. बन यांनी दिला.