राजापूर : राष्ट्रीय महामार्ग सार्वजनिक बांधकाम विभाग उपअभियंता श्री कुमावत यांना आंदोलनस्थळी पाचारण करून निवेदन देण्यात आले.. रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मध्यवर्ती राजापुरातील हातीवले येथे हे सर्वपक्षीय आंदोलन छेडण्यात आले.. सर्व सामान्यांच्या प्रश्नांसाठी नेहमीच पुढाकार घेणाऱ्या व प्रसंगी एकाकीही लढणाऱ्या कोंढेतडचे माजी उपसरपंच अरविंद लांजेकर यांनी अत्यंत प्रयासाने या आंदोलनासाठी सर्वाना एकत्रित करून या प्रश्नाला वाचा फोडली.

मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील हातिवले टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे राजापूर तालुक्यातील सर्वपक्षीय पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, वाहन चालक व शेतकरी एकत्र आले. स्थानिक नागरिकांना संपूर्ण टोल माफी द्यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देत राष्ट्रीय महामार्ग अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले.
महामार्गाचे काम अद्याप अपूर्ण, निकृष्ट दर्जाचे असून अनेक ठिकाणी अपघात होत असल्याची नाराजी व्यक्त करण्यात आली. भू-संपादन मोबदला, सर्विस रोड, स्ट्रीट लाईट, बस स्टॉप, सुरक्षा सुविधा यांसह अनेक कामे प्रलंबित असताना टोल वसुली सुरू करू नये, अशी ठाम भूमिका मांडण्यात आली.
यापूर्वीही स्थानिकांच्या आंदोलनामुळे व निलेश राणे यांच्या पुढाकाराने टोल बंद झाला होता. पुन्हा टोल सुरू करण्याच्या हालचालींमुळे राजापूर तालुक्यात आंदोलनाची तयारी सुरू झाली असून टोल प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे