मुंबई : महाराष्ट्रातील तरुणपिढीला बरबाद करणारे ड्रग्जचे विष आता मुंबई-पुणे सारख्या मोठ्या शहरातच नाही तर तालुक्यापर्यंत पोहोचलेले आहे. गुजरातच्या कांडला बंदरातून महाराष्ट्रापर्यंतच्या ड्रग्ज कॉरिडॉरमधून हे विष आपल्या राज्यात येत आहे. राजकीय आशिर्वादामुळेच ‘उडता पंजाब’ प्रमाणे ‘डुबता महाराष्ट्र’ बनवण्याचे पाप महायुतीने केले आहे. महाराष्ट्राच्या तरुणाईला बरबाद करणाऱ्या महायुती सरकारला जनता कदापी माफ करणार नाही, असा इशारा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे.

मुंबईतील नेस्को मध्ये पोलिस स्टेशनच्या समोरच ड्रग्ज व दारु पार्टी होते हे कशाचे द्योतक आहे? हे पोलीस प्रशासन, गृहमंत्री तसेच मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचे अपयश आहे. फडणवीस यांच्या काळात राज्यातील कायदा सुव्यवस्था रसातळाला गेली आहे. ड्रग्जचा राजरोस धंदा जोरात सुरु असताना अशोक खरात, नाशिकमध्ये आयटी कंपनीत महिला कर्मचाऱ्यांचे लैंगिक शोषण, अमरावतीमध्येही शेकडो मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. नाशिकच्या प्रकरणात जबरदस्तीने धर्मांतराचा मुद्दा चर्चिला जात आहे. याप्रकरणी एफआयआर सार्वजनिक करण्याची गरज आहे आणि सर्व प्रकरणात कठोर कारवाई केली पाहिजे. राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसल्याने महाराष्ट्रातील स्थिती अत्यंत बिकट बनलेली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी गृहमंत्री पदाचा राजीनामा देऊन राज्याला पूर्णवेळ सक्षम गृहमंत्री द्यावा, अशी मागणीही हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.