खेड (प्रतिनिधी) : – तालुक्यात गुरुवारी २३ एप्रिल दुपारनंतर अचानक वातावरणात बदल होत विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. खेड शहरासह ग्रामीण भागात मेघगर्जनेसह दमदार पावसाच्या सरी कोसळल्याने नागरिकांची एकच तारांबळ उडाली.
गेल्या अर्ध्या तासापासून सुरू असलेल्या मुसळधार सरींमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचले असून मुंबई-गोवा महामार्ग वरील वाहतूक काही काळ मंदावल्याचे चित्र पाहायला मिळाले. अचानक आलेल्या पावसामुळे वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागला. दरम्यान, भारतीय हवामान विभाग यांनी कोकण किनारपट्टीसाठी गुरुवारी ऑरेंज अलर्ट जारी केला होता. त्यानुसार दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज तंतोतंत खरा ठरला आहे. पुढील दोन दिवसही अशाच प्रकारचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या अवकाळी पावसाचा फटका एप्रिल महिन्यातील आंबा पिकाला बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. सध्या हापूस आंबा तोडणीच्या हंगामात असताना पावसामुळे फळ गळ, गुणवत्तेत घट तसेच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग चिंतेत सापडला आहे.
खेड तालुक्यात विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; आंबा पिकाला फटका
