मुंबई : महिला आरक्षणाला विरोध करून लाखो महिलांच्या स्वप्नांचा चक्काचूर करणाऱ्या विरोधी पक्षांना या लाखो महिलांचा आक्रोश स्वस्थ बसू देणार नाही, अशी घणाघाती टीका करत, कितीही विरोध झाला तरी महिलांना आरक्षण मिळवून देण्याचे लक्ष्य भाजपा गाठणारच, असा निर्धार भाजपा महिला प्रदेशाध्यक्षा आ. चित्रा वाघ यांनी शनिवारी व्यक्त केला. भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. भाजपा प्रदेश सहमाध्यम प्रमुख ओमप्रकाश चौहान यावेळी उपस्थित होते.
भाजपा महिलांचा गैरवापर करत आहे, या प्रियांका गांधी यांच्या आरोपाचा खरपूस समाचार घेत, आ. चित्रा वाघ म्हणाल्या की, वापर करण्यासाठी महिला या काही वस्तू नाहीत. भाजपात महिलांवर अन्याय केला जात नाही, तर भाजपा कायम महिलांचा सन्मानच करते. भाजपाने काढलेल्या मोर्चाच्या निमित्ताने लाखो महिलांचा आवाज तुमच्या कानापर्यंत गेला नाही, हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. मात्र, लाखो महिलांना अधिकार आणि हक्क मिळवून देण्याचे आमचे जे मुख्य ध्येय आहे, त्यापासून आम्ही किंचितही ढळणार नाही. आमचा आवाज दिवसेंदिवस बुलंद होत जाईल आणि येत्या काळात देशाचे सर्वोच्च सभागृह संसद आणि प्रत्येक राज्यातील विधानसभेत सर्वसामान्य महिला प्रतिनिधित्व करताना दिसतील, असे आ. चित्रा वाघ यांनी नमूद केले.
