रायगड : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग कोकणच्या विकासाची जीवनवाहिनी मानली जातेय. कोकणच्या अद्भुत निसर्गाला जोडणारा हा मार्ग आता जवळपास पूर्णत्वास आला आहे. अशातच मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला कोकणचे भाग्यविधाते , माजी मुख्यमंत्री, बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांचे नाव द्यावे अशी जोरदार मागणी माजी आमदार तथा भाजपचे नेते पंडित शेठ पाटील यांनी केलीय.
पंडित पाटील यांनी आपल्या वाढदिवशी काँग्रेस नेते बॅरिस्टर ए. आर. अंतुले यांच्या दैदिप्यमान कार्याचा गौरव करताना अंतुले साहेबांच्या रायगड , कोकण व महाराष्ट्राच्या जडणघडणीत खूप मोठं योगदान राहिले असून त्याकाळी अंतुले साहेबांनी आपल्या कृतीतून विकासपुरुष म्हणून कोकणवासीयांच्या हृदयावर आपलं नाव कोरले आहे. असे पाटील म्हणाले. रायगड जिल्ह्याचा विकास ज्या ज्या नेत्यांनी केला त्यांचा आजच्या राज्यकर्त्यांना विसर पडला आहे. रायगड जिल्ह्यात दोनच पक्ष होते, एक काँग्रेस आणि दुसरा शेतकरी कामगार पक्ष .
रायगड जिल्ह्यातील तत्कालीन नेते आप्पासाहेब नारायण नागू पाटील, बॅरिस्टर अंतुले साहेबांची तात्काळ निर्णयक्षमता, प्रखर बुद्धिमत्ता,काम उरकण्याचा विलक्षण झपाटा, सर्वसामान्य गोरगरीब जनतेची कामे व प्रश्न जलद सोडविण्याची त्यांची तळमळ यामुळे बॅरिस्टर ए आर अंतुले यांचे व्यक्तिमत्व कोकणवासीय व महाराष्ट्राच्या मनावर कायम कोरले आहे. असे पाटील म्हणाले. त्यामुळे पक्ष भेद विसरून सर्वांनी एकत्र येऊन मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाला बॅरिस्टर ए आर अंतुले साहेब यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी पंडीत पाटील यांनी केली. या मागणीला भाजपचे युवा नेते ऍड अंकित बंगेरा यांनी सहमती दर्शवली.