मुंबई : महाकारुणी भगवान गौतम बुद्धांनी दिलेला बौद्ध धम्म हा अखिल मानवजातीसाठी आदर्श जीवनमार्ग आहे. सर्व जाती-धर्माच्या लोकांना बुद्धविचार कळला आहे. भारतातच नव्हे तर संपूर्ण विश्वात बुद्धविचार स्वीकारला जात आहे. भगवान बुद्धांनी मानवतेचा, विज्ञानवादी, अहिंसेचा, विश्वशांतीचा, विश्वबंधुत्वाचा आणि विश्वकल्याणाचा विचार जगाला दिला आहे. भारतात स्थापन झालेला बौद्ध धम्म जगभर प्रसारित झाल्याचा आपल्याला अभिमान असला पाहिजे, असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
बुद्धपौर्णिमेच्या उत्सवानिमित्त घाटकोपर (पश्चिम), भीमनगर येथील धम्मरत्न बुद्धविहार येथे महाकारुणी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आणि महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची स्थापना केंद्रीय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी झालेल्या जाहीर सभेत ना. रामदास आठवले बोलत होते. जगात भगवान बुद्धांचे व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नाव गाजत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेले संविधान हे सर्व जाती-धर्मांसाठी आहे. एका धर्माने दुसऱ्या धर्माचा सन्मान केला पाहिजे. कोणीही कुणाच्या धार्मिक भावना दुखावू नयेत. एकमेकांच्या धर्माचा सन्मान करून एकमेकांच्या धार्मिक उत्सवात सहभागी झाले पाहिजे. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा आणि जनतेचा मला आशीर्वाद आहे. तुमचा मला आशीर्वाद नसता तर केंद्रात मंत्रिपदापर्यंत पोहोचू शकलो नसतो.
एकच लक्ष, एकच पक्ष—रिपब्लिकन पक्ष—आणि सत्ता मिळविण्याकडे लक्ष ठेवा, असे सांगत महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील रिपब्लिकन पक्ष मी देशभर वाढवत आहे. तुम्हीही रिपब्लिकन पक्ष वाढविण्याचा निर्धार करा, असे आवाहन ना. रामदास आठवले यांनी केले.
