दापोली : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथे ‘जनगणना २०२७’ मोहिमेला आज भव्य सुरुवात होत आहे. राज्यात प्रथमच ही जनगणना पूर्णपणे डिजिटल व नागरिक-केंद्रित पद्धतीने राबवली जात असून, नागरिकांना स्व-गणनेची सुविधा उपलब्ध होत आहे.
यावेळी दापोली येथे प्रांताधिकारी डॉ. विजयकुमार सूर्यवंशी, तहसीलदार अर्चना घोलप, नगराध्यक्ष कृपा घाग तसेच सभापती उमेश राजे यांच्या उपस्थितीत ऑनलाइन पोर्टलवर स्व-गणना करून मोहिमेचा औपचारिक शुभारंभ केला जात आहे. मान्यवरांनी नागरिकांना या राष्ट्रीय उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे आवाहन केले आहे. जनगणना प्रक्रियेच्या पहिल्या टप्प्यात १ मे ते १५ मे दरम्यान नागरिकांना मोबाईल अॅप व ऑनलाइन प्रणालीद्वारे स्वतःची माहिती नोंदवता येत आहे. दुसऱ्या टप्प्यात १६ मे ते १४ जून या कालावधीत अधिकृत गणकांकडून घरभेटी देत माहिती संकलित केली जाणार आहे.
“आपला सहभाग म्हणजे देशाच्या भविष्यासाठी योगदान” हा संदेश देत प्रशासनाकडून व्यापक जनजागृती मोहीम राबवली जात आहे. डिजिटल सुविधा, QR कोड व सोपी नोंदणी प्रक्रिया यामुळे जनगणना अधिक सुलभ व पारदर्शक होत आहे. तहसीलदार कार्यालय, दापोली यांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की, अचूक व प्रामाणिक माहिती देऊन या महत्त्वपूर्ण राष्ट्रीय कार्यात सहभागी व्हावे. जनगणना ही केवळ शासकीय प्रक्रिया नसून देशाच्या विकासाचे भक्कम आधारस्तंभ असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
