चिपळूण : चिपळूण तालुक्यातील मुंढे गावचे ग्रामदैवत असलेल्या श्री केदारनाथांच्या त्रैवार्षिक यात्रोत्सव (समा) उत्साहपूर्ण वातावरणात व मोठ्या जल्लोषात संपन्न झाला.२९ एप्रिल ते १ मे कालावधीत पार पडलेल्या भव्य सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि उत्साहाचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला.
यात्रोत्सवाच्या पहिल्या दिवशी भव्य राज्यस्तरीय बैलगाडा शर्यतीने उत्सवाची दणदणीत सुरुवात झाली. “श्री केदारनाथ केसरी”या स्पर्धेत राज्यभरातील नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.पहिल्या दिवशी आयोजित केदारनाथ केसरी बैलगाडा स्पर्धेत हिंद केसरी कार्तिक आणि पब्लिक किंग किस्मत यांच्या जोडीने प्रथम क्रमांक पटकाऊन तब्बल १,०१,००१ रुपयांचे रोख पारितोषिक पटकावले.द्वितीय क्रमांक हिंदकेसरी वजीर आणि पब्लिक स्पीड किंग गरुडायांनी पटकावले,तृतीय क्रमांक कोकण एक्सप्रेस डॉन आणि पब्लिकचा बेताज बादशाह पाखऱ्या या जोडीने पटकावला तर चतुर्थ क्रमांकाचे पारितोषिक कोकण केसरी,भारत केसरी,चतुर्थ हिंदकेसरी सोन्या आणि पब्लिक किंग कॅडबरी जोडीने पटकावला इतर क्रमांकांसाठीही आकर्षक रोख बक्षिसे आणि मानाच्या ढाली देण्यात आल्या,या स्पर्धेमुळे या जत्रोत्सावाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.यात्रेच्या दुसऱ्या दिवशी ३० एप्रिल रोजी स.१० ते सायं.६ वेळेत लाटेचे पूजन व नेत्रदीपक मिरवणूक सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला.मुंडे वरचीवाडी ते ग्रामदैवत मंदिर या गावातील प्रमुख रस्त्यावरुन मिरवणूक निघाली. पारंपरिक वाद्यांच्या गजरात, ढोल-ताशांच्या निनादात आणि जयघोषात निघालेल्या या मिरवणुकीने संपूर्ण गाव दुमदुमून गेले.ग्रामस्थांसह भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद लुटला.
यात्रोत्सवाच्या मुख्य तिसऱ्या दिवशी १ मे रोजी ग्रामदैवत तळसरच्या काळकाई-
कळंबाई-रुद्राई-वाघजाई पालखीचे आगमन होऊन पारंपरिक पद्धतीने स्वागत करण्यात आले.या पालखीची आणि ग्रामदैवत केदारनाथ मुंडे पालखीचा अविस्मरणीय पालखी भेट सोहळ्याने भाविकांच्या मनात भक्तीची भावना अधिक दृढ झाली. दुपारी झालेल्या स्नेहभोजनाच्या कार्यक्रमात सर्व भाविकांनी एकत्र येत प्रसादाचा लाभ घेतला. सायंकाळी लाट फिरवणे व पालखी नाचविण्याचा पारंपरिक कार्यक्रम उत्साहात पार पडला.रात्री आयोजित करमणूक कार्यक्रम व “वैभव म्युझिकल नाईट, कोल्हापूर” यांच्या सुरेल सादरीकरणाने वातावरण रंगतदार झाले.
या तीन दिवसीय यात्रोत्सवातून धार्मिक श्रद्धा,सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक एकोपा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. ग्रामस्थांच्या उत्कृष्ट नियोजनामुळे हा सोहळा यशस्वीपणे पार पडला. एकूणच,श्री केदारनाथ त्रैवार्षिक यात्रोत्सव मुंढे गावासाठी अविस्मरणीय ठरला.विविध राजकीय पक्षातील मंडळी,मुंबईकर चाकरमानी,पंचक्रोशीतील ग्रामस्थ तसेच कोकणातील हजारो श्री केदारनाथ भक्तगणांनी उपस्थित राहून या सोहळ्याचा आनंद घेतला बैलगाडा कमिटी,यात्रा नियोजन कमिटी आणि समस्त मुंडे गावातील ग्रामस्थांनी तीन दिवस झालेल्या यात्रोत्सव कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली.