मुंबई : पेट्रोल-डिझेलच्या दरवाढीबाबत काही आश्चर्य वाटत नाही. ही फक्त सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी है. कशाचेही सोंग घेता येते हो, पण पैसे आणि अन्नधान्याचे सोंग घेता येत नाही, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा महासंसदरत्न खासदार सुप्रिया ताई सुळे यांनी मुंबई येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

मुंबईमध्ये पेट्रोल पंप बंद पडत असल्याच्या प्रश्नावर बोलताना सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या की, मला अजिबातच आश्चर्य वाटत नाही. मागच्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि छगन भुजबळ यांची वेगवेगळी विधाने आहेत. फडणवीस यांनी म्हटले की, काही काळजी करू नका, आपल्याकडे पेट्रोल-डिझेल आहे. आम्ही विश्वास ठेवला. भुजबळ म्हणाले की, ३० दिवसांचा साठा आहे, काटकसरीने वापरा. याचा काय अर्थ काढायचा? काय नियोजन केले? राहुल गांधी गेल्या सहा महिन्यांपासून या गोष्टी मांडत आहेत. काय करतंय सरकार? याबाबतीत सरकार का खरं बोलत नाही, असे सुप्रिया ताई सुळे यांनी सांगितले.

सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या की, महागाई, भ्रष्टाचार आणि बेरोजगारी याबाबत आम्ही सविस्तर चर्चा करणार आहोत. इलेक्शन येतील आणि जातील; पण जो सामान्य माणूस आहे, जो टॅक्स भरत आहे, त्याने कसे जगायचे? घरी जाऊन भाज्यांचे भाव विचारा. एकीकडे कांद्याला शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आणि जो ग्राहक आहे, त्याला तो परवडत नाही, असेही सुप्रिया ताई सुळे म्हणाल्या.