मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला, तर महाराष्ट्रात सरकार विरोधात मोठे वातावरण निर्माण होईल. आम्ही केलेल्या आंदोलनाचे पडसाद सरकारला उमटले आहेत. मुख्यमंत्री आंदोलनांना राजकीय स्टंट म्हणत असतील, तर विरोधकांना रस्त्यावर उतरावे लागते, यासाठी सरकारच जबाबदार आहे. असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुंबई येथे प्रसार माध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले की, राज्यात कांद्याला योग्य भाव मिळावा आणि निर्यात धोरणात सुधारणा व्हावी या मागणीसाठी महाविकास आघाडीने राज्यभर आक्रमक आंदोलन छेडले आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड, तसेच संभाजीनगर, जुन्नूर आणि ओतुर या कांदा उत्पादक पट्ट्यांमध्ये रास्ता रोको, मोर्चे आणि निदर्शने करण्यात आली. आंदोलनादरम्यान अनेक कार्यकर्ते आणि शेतकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मे २०२६ मध्ये चांदवड येथे झालेल्या मोठ्या आंदोलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनी कांद्याला प्रति क्विंटल ३ हजार रुपये हमीभाव देण्याची प्रमुख मागणी केली.असे शशिकांत शिंदे बोलताना म्हणाले.

मनोज जरांगे पुन्हा आंदोलनाच्या तयारीत असल्याच्या चर्चांवर भाष्य करताना शशिकांत शिंदे म्हणाले की,सरकारने वेळेत निर्णय घेऊन मार्ग काढण्याचा प्रयत्न करावा. अन्यथा परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. असा इशारा पुन्हा एकदा शशिकांत शिंदे यांनी दिला आहे.