रोहा ( अल्ताफ चोरडेकर) : आपसात संगणमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व खोटी कागदपत्रे तयार करून धाटाव एमआयडीसी क्षेत्रातील कोरस कंपनीला तब्बल ४५ लाख रुपयांचा गंडा घातल्याचा धक्कादायक प्रकार रोहे तालुक्यातील धाटाव एमआयडीसीत घडला आहे. या घटनेमुळे एमआयडीसी क्षेत्रात खळबळ उडाली असून रोहा पोलीस ठाण्यात ५ जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या आरोपितांमध्ये एका महिला आरोपीचा समावेश असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
राजेश उन्नीकृष्णन नायर, आशिष जैन,कल्पना चावला, योगेश सकपाळ व हीर यादव असे परप्रांतीय आरोपी व्यक्तींची नावे असून या पाच जणांनी आपसात संगणमत करून बोगस कंपनी स्थापन करून बनावट नावे व कागदतपत्रांच्या आधारे धाटाव एमआयडीसीतील कोरस इंडिया लिमिटेड या कंपनीकडून १५०० किलो ग्रॅम आंब्रोक्सल एचसीएल आयपी ही औषधी पावडरचा कच्चा माल घेतला. या. व्यवहारापोटी सदर भामट्यांनी कंपनीला ३०% रक्कम अदा केली उर्वरित ७०,% रक्कम काही दिवसानंतर अदा केली जाईल असे आपसात ठरले होते. दिलेल्या वेळेत कंपनीला उर्वरित जवळपास ३५ लाख रुपये रक्कम कंपनीच्या खात्यात जमा केली जात नाही.म्हणून कंपनीकडून वारंवार तगादा लावण्यात आला. त्यानंतर दि.१२ नोव्हेंबर २०२५ ते २९ मे २०२६ या दरम्यान आपली फसवणूक झाली असल्याचा अंदाज येताच कंपनी व्यवस्थापकानी पोलिस ठाण्यात धाव ठोकली.
२९ मे २०२६ रोजी रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत कंपनीचे व्यवस्थापक राजेंद्र शिवदास पाटील ( रा. पारसीवाडी कोपरी जि.ठाणे) यांनी पोलिस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या घटनेची माहिती समजताच आरोपी पसार झाले असून पुढील तपास उपनिरीक्षक सूर्यकांत पवार करीत आहेत…