मुंबई : राज्यातील कला, संस्कृती आणि लोकपरंपरांच्या जतन-संवर्धनासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध पुरस्कार, शिष्यवृत्ती, अनुदान आणि कलाकार कल्याण योजनांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. बैठकीत सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमध्ये काळानुरूप सुधारणा करून ते अधिक प्रभावी, पारदर्शक आणि कलाकाराभिमुख करण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्याचे निर्देश मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

महाराष्ट्र भूषण पुरस्कारासह गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार, भारतरत्न पंडित भीमसेन जोशी शास्त्रीय संगीत जीवनगौरव पुरस्कार, नटवर्य प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, संगीताचार्य अण्णासाहेब किर्लोस्कर रंगभूमी जीवनगौरव पुरस्कार, तमाशा सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर पुरस्कार, ज्ञानोबा-तुकाराम पुरस्कार तसेच राज्य सांस्कृतिक आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारांच्या नियमावली व निवड प्रक्रियेचा सविस्तर आढावा या बैठकीत घेण्यात आला. गुणवत्ताधिष्ठित निवड, तज्ज्ञ समित्यांचा सहभाग आणि वेळबद्ध पुरस्कार प्रक्रिया राबविण्याचे निर्देश यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी दिले.

राज्य सांस्कृतिक पुरस्कार आणि राज्य सांस्कृतिक युवा पुरस्कारांमध्ये सुधारणा करून कलाक्षेत्रांची संख्या वाढविणे, नव्या कला प्रकारांचा समावेश करणे आणि अधिकाधिक गुणवंत कलाकारांना सन्मानित करण्याच्या प्रस्तावांवर यावेळी चर्चा झाली. राज्यातील विविध सांस्कृतिक क्षेत्रांतील ज्येष्ठ व युवा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी पुरस्कारांची व्याप्ती अधिक व्यापक करण्याचे, तसेच तमाशा, दशावतार, शाहिरी, खडीगंमत, संगीतबारी, भजनी मंडळे, झाडीपट्टी, नमन-खेळे आणि वहीगायन यांसारख्या पारंपरिक लोककला प्रकारांना अधिक प्रोत्साहन देण्याचे निर्देश यावेळी मंत्री ॲड. शेलार यांनी दिले. यामुळे ग्रामीण भागातील लोककलावंतांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.