ठाणे : ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाढती वाहतूक कोंडी, वारंवार होणारे अपघात आणि मृत्यूंच्या घटनांवरून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली आहे.
घोडबंदर रोडला वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देण्याची मागणी होत असताना, हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याने त्याचे नामांतर ‘यमलोक मार्ग’ असे करावे, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. गेल्या सोळा महिन्यांत या मार्गावर झालेल्या विविध अपघातांमध्ये सत्तावीस जणांचा मृत्यू झाल्याचा दावा करत, अशा रस्त्याला महान सेनानी वीर चिमाजी अप्पा यांचे नाव देणे म्हणजे त्यांचा अवमान असल्याचे प्रधान म्हणाले. विकासाच्या नावाखाली घोडबंदर परिसरातील नागरिकांना वाहतूक कोंडी, खड्डे, मेट्रोची रखडलेली कामे आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांचा त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोपही त्यांनी केला.