पोलादपूर (शैलेश पालकर) : केंद्र सरकारने राज्याच्या दुग्धोत्पादनवाढीसाठी अर्थसंकल्पातील तरतूद वाढवली आहे. कृषिप्रधान भारतात कृषी उत्पादनवाढीसाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू असून, रायगड जिल्हा परिषदेने कारभारात लोकाभिमुखता आणण्यासाठी प्रत्येक विभागाचे मेळावे आयोजित करून विविध योजना जनतेपर्यंत पोहोचविण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.

रायगड जिल्हा परिषदेच्या येत्या पुरवणी अर्थसंकल्पात कृषी विभागासाठी आर्थिक तरतूद वाढविल्यास पोलादपूर तालुक्यातील शेतकऱ्यांना अधिकाधिक लाभ मिळेल, अशी ग्वाही रायगड जिल्हा परिषदेचे कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समितीचे सभापती वैकुंठ पाटील यांनी पोलादपूर तालुकास्तरीय कृषी मेळाव्याप्रसंगी दिली.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे अर्थ, शिक्षण व क्रीडा सभापती चंद्रकांत कळंबे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मेळाव्यात पंचायत समितीचे सभापती अविनाश शिंदे, उपसभापती अनिता भिलारे, जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार, गटविकास अधिकारी उदयसिंह साळुंखे, सहायक गटविकास अधिकारी विजय काणेकर, तालुका कृषी अधिकारी वैशाली फडतरे, पंचायत समिती कृषी विस्तार अधिकारी अरुण धिवरे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक लक्ष्मण मोरे, भाजपच्या प्रदेश सदस्या डॉ. कुद्रीमोती, माजी जिल्हा उपाध्यक्ष मनोज भागवत, जिल्हा महिला उपाध्यक्षा तनुजा भागवत, तालुका अध्यक्ष वैभव चांदे, तालुकाप्रमुख निलेश अहिरे, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी व साक्षी कांबळेकर, उद्यान पंडित रामचंद्र कदमशेठ तसेच अन्य मान्यवर आणि प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.

यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा विभागामार्फत विविध गट व वैयक्तिक लाभाच्या योजनांची माहिती देणाऱ्या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.