मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा २०२२ सारख्या मोठ्या भूकंपाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षाने बंडखोरी रोखण्यासाठी आणि आपल्या खासदारांची एकनिष्ठता तपासण्यासाठी आज दिल्लीत बोलावलेल्या आपत्कालीन बैठकीत ठाकरे गटाला मोठा झटका बसला आहे.
‘थ्री-लाइन व्हिप ‘ जारी करूनही सकाळी ११ वाजता सुरू झालेल्या या बैठकीला संजय राऊतांसह केवळ ३ खासदार उपस्थित राहिले आहेत, तर उर्वरित ६ बंडखोर खासदारांनी या बैठकीकडे साफ पाठ फिरवली आहे, हे स्पष्ट झाले आहे.
पक्षातील संभाव्य बंडखोरी मोडून काढण्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार दिल्लीतील जुन्या संसद भवनात ही तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. खासदारांची अधिकृत उपस्थिती नोंदवण्यासाठी स्वतंत्र कॉपी (उपस्थिती पुस्तक) तयार करण्यात आली होती. मात्र, या बैठकीला केवळ खालील प्रमुख नेते आणि खासदारच पोहोचू शकले आहेत.संजय राऊत (राज्यसभा खासदार)
अनिल देसाई (मुख्य प्रतोद) ,अरविंद सावंत (लोकसभेतील गटनेते) , राजाभाऊ वाजे (नाशिकचे खासदार) या ३ लोकसभा खासदारांव्यतिरिक्त इतर ६ खासदार बैठकीला अनुपस्थित राहिल्याने ठाकरे गटाची धाकधूक कमालीची वाढली आहे. या बैठकीनंतर संजय राऊत आणि अरविंद सावंत हे पुढील रणनीतीसाठी संसदेच्या दिशेने रवाना झाले आहेत.
