चिपळूण : देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी कथितपणे खेळ करणाऱ्या नीटसह विविध स्पर्धा परीक्षांतील पेपरफुटी प्रकरणांविरोधात आणि दिल्लीतील जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनावर झालेल्या पोलिसी कारवाईच्या निषेधार्थ युवासेनेच्या वतीने गुरुवारी चिपळूणमध्ये तीव्र आंदोलन छेडण्यात आले. डी.बी.जे. महाविद्यालयासमोर सकाळी ११ वाजता आयोजित करण्यात आलेल्या स्वाक्षरी अभियानाला विद्यार्थी, पालक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

देशभरात विद्यार्थ्यांच्या न्यायाच्या लढ्याला पाठिंबा देण्यासाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत हे आंदोलन आयोजित करण्यात आले होते. दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थी नेते सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनावर झालेल्या कथित लाठीमाराचा निषेध म्हणून उपस्थितांनी काळ्या फिती बांधत जोरदार घोषणाबाजी केली.

युवासेना प्रमुख मा. आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार आयोजित या आंदोलनाचे नेतृत्व युवासेना चिपळूण तालुका अधिकारी प्रितम वंजारे आणि शहर अधिकारी पार्थ जागुष्टे यांनी केले. आंदोलनात रत्नागिरी (उत्तर) जिल्हाप्रमुख तथा युवा सेना महाराष्ट्र राज्य कार्यकारिणी सदस्य विक्रांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी बोलताना विक्रांत जाधव म्हणाले, “आजचा प्रश्न केवळ एका परीक्षेचा नाही तर लाखो विद्यार्थ्यांच्या कष्टांचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि देशाच्या शिक्षण व्यवस्थेवरील विश्वासाचा आहे. पेपरफुटी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याऐवजी न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठ्या चालविणे हा लोकशाहीवरील डाग आहे. विद्यार्थ्यांचा आवाज दडपण्याचा प्रत्येक प्रयत्न लोकशाहीवादी शक्ती हाणून पाडतील,” असा तीव्र इशारा दिला.

स्वाक्षरी अभियानात विशेषतः विद्यार्थी आणि पालकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवत केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला. आंदोलनादरम्यान परिसर घोषणांनी दणाणून गेला.

या आंदोलनात चिपळूण विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव (बाळा) कदम, तालुका संघटक राजू देवळेकर, शहर प्रमुख सचिन (भैया) कदम, जिल्हा सोशल मीडिया प्रमुख (दक्षिण) सचिन चोरगे, शहर सचिव प्रशांत मुळये, उपशहर प्रमुख मनोज पांचाळ, विभाग प्रमुख संकेत शिंदे, अमोल टाकळे यांच्यासह युवा सेनेचे आकाश कदम, ओंकार गायकवाड, राहुल गुरव, राहुल भोसले, आयुष कुबडे, साहिल मुजावर, शाकीर आरकटे, मोहम्मद अली सरगुरोह, युवराज कांबळे, सुयोग कदम, अली साबळे, अफान मुकादम, आदर्श कदम, आर्यन मोरे, सुप्रिया वंजारे, तीर्था लाड, श्रीया खेडेकर, अफिफा शहा तसेच अनेक शिवसैनिक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

युवासेनेने स्पष्ट केले की, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्यांना आणि न्याय मागणाऱ्या विद्यार्थ्यांचा आवाज दडपणाऱ्यांना जनतेसमोर उत्तर द्यावेच लागेल. विद्यार्थ्यांच्या हक्कासाठीचा हा संघर्ष थांबणार नसून, न्याय मिळेपर्यंत आंदोलन अधिक तीव्र केले जाईल.