राजापूर : गतवर्षी तब्बल १६८ दिवस मुक्काम केलेली जगप्रसिद्ध राजापूरची गंगामाई साडेसात महिन्यांतच पुन्हा दिमाखात प्रवाहित झाली आहे. मूळ गंगेसह गोमुखातून मोठ्या प्रवाहाने पाणी वाहत आहे. गंगाक्षेत्रातील काशीकुंड तुडुंब भरले असून, परिसरातील इतर कुंडांमध्येही मोठ्या प्रमाणात पाणीसाठा झाल्याने परिसरात पुन्हा एकदा भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
८ जुलै २०२६ रोजी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती गंगापुत्रांकडून देण्यात आली. मात्र, गुरूपौर्णिमेपासून गंगेचा प्रवाह वाढला आहे. सध्या मूळ गंगेचा प्रवाह वेगाने सुरू असून, गोमुखातूनही अविरत पाणी वाहत आहे. पावसाळ्यात असे दृश्य सहसा पाहायला मिळत नसल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. राजापूर तालुक्याचे एक वैशिष्ट्य असलेल्या गंगामाईला शतकानुशतके धार्मिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक महत्त्व लाभले आहे. पूर्वी गंगामाई साधारण तीन वर्षांनी प्रकट होत असे. डिसेंबर ते जून या कालावधीत तिचे आगमन होऊन दोन ते अडीच महिने वास्तव्य केल्यानंतर ती अंतर्धान पावत असे. त्यानंतर पुन्हा जवळपास तीन वर्षांनी गंगेचे आगमन होत असल्याची परंपरा होती.
गेल्या १५ ते २० वर्षांत मात्र गंगेच्या आगमन-निर्गमनाच्या चक्रात लक्षणीय बदल झाल्याचे दिसून येत आहे. गमन झाल्यानंतर अवघ्या वर्षभरातच गंगा पुन्हा प्रकट झाल्याच्या घटना घडल्या असून, काहीवेळा तिचा प्रवाह दीर्घकाळ कायम राहिल्याचेही पाहायला मिळाले आहे. राजापूरची गंगामाई ही नैसर्गिक आणि धार्मिकदृष्ट्या अद्वितीय घटना मानली जाते. मात्र, गेल्या दोन दशकांत तिच्या आगमन-निर्गमनाच्या चक्रात झालेला बदल हा भूगर्भशास्त्रज्ञ, जलतज्ज्ञ आणि पर्यावरण अभ्यासकांसाठी संशोधनाचा महत्त्वाचा विषय ठरत आहे. या बदलामागील नेमकी वैज्ञानिक कारणे शोधण्यासाठी व्यापक आणि शास्त्रीय अभ्यासाची आवश्यकता असल्याचे जाणकारांचे मत आहे.
