मुंबई : महाराष्ट्र शासनाने परिचालनासाठी घेतलेल्या कर्जत येथील एन. डी.स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी आज स्वीकारला. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या अंतर्गत संचालक मंडळाचे ते पहिले अध्यक्ष ठरले आहेत. पदभार स्वीकारल्यानंतर त्यांच्या अध्यक्षतेखाली एन. डी. स्टुडिओच्या संचालक मंडळाची बैठक घेण्यात आली. चित्रपट निर्मितीला अधिक चालना देणे, निर्मात्यांसाठी चित्रिकरणाचा खर्च कमी करणे आणि एन. डी. स्टुडिओचा प्रभावीपणे विकास करणे या दृष्टीने बैठकीत विविध महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.

एन. डी. स्टुडिओ हे चित्रिकरणासाठी आवश्यक असलेल्या विविध सुविधा आणि वैविध्यपूर्ण स्थळांसाठी प्रसिद्ध असून, येथे मराठीसह हिंदी तसेच इतर भाषांमधील चित्रपट, दूरचित्रवाणी मालिका, वेबसीरिज आणि विविध दृकश्राव्य निर्मितींच्या चित्रिकरणाला मोठ्या प्रमाणावर वाव आहे. या पार्श्वभूमीवर निर्माते, दिग्दर्शक, कलाकार आणि तंत्रज्ञांना अधिक अनुकूल वातावरण उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के सवलत देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय बैठकीत घेण्यात आला.

या बैठकीस सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक स्वाती म्हसे-पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी तथा सह व्यवस्थापकीय संचालक प्रशांत साजणीकर, मुख्य वित्तीय अधिकारी चित्रलेखा खातू , सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तसेच महामंडळाचे इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.