पुणे – चाकण परिसरातील विविध समस्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून, त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी सर्व संबंधित शासकीय यंत्रणा आणि संस्थांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. चाकणच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीने कामाचा रोडमॅप तयार केला असून, समितीला आवश्यक त्या सूचना व मागण्या ऐकून घेऊन काम करण्यास पूर्ण सहकार्य केले जाईल, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आज केले.
शासकीय विश्रामगृह येथे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी चाकण परिसरातील विविध प्रश्न तसेच चाकणच्या सर्वांगीण विकासासाठी गठित उच्चस्तरीय समितीच्या कामकाजाचा आढावा घेतला.
यावेळी खेड-आळंदीचे आमदार बाबाजी काळे,उपमुख्यमंत्री महोदयांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, पीएमआरडीए आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम उपस्थित होते.
चाकणच्या समस्या सोडविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणा एकाच व्यासपीठावर आल्या असून, ही सकारात्मक बाब आहे.समितीच्या माध्यमातून विविध प्रश्नांचा सखोल अभ्यास करून त्यावर टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येत आहे, असे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
चाकण परिसरातील वाढती लोकसंख्या, औद्योगिक विस्तार आणि वाहतुकीचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुरक्षाव्यवस्था अधिक सक्षम करण्याची आवश्यकता आहे. यासाठी तातडीने १०० सुरक्षा कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची कार्यवाही करण्यात येत असून, आवश्यकतेनुसार नवीन पोलिस ठाणी उभारण्याबाबतही कार्यवाही सुरू असल्याचे सुनेत्रा पवार यांनी सांगितले. चाकण हे मोठे औद्योगिक केंद्र असून देश-विदेशातून अनेक नागरिक व उद्योजक येथे येतात. त्यामुळे परिसराची स्वच्छता, सुरक्षितता आणि पायाभूत सुविधा दर्जेदार असणे आवश्यक आहे. चाकणमध्ये येताना रस्त्याच्याकडेला मोठ्या प्रमाणात कचरा व प्लास्टिक दिसणे ही चिंतेची बाब आहे. या समस्येवर तातडीने उपाययोजना करण्यासाठी संबंधित यंत्रणांशी चर्चा करण्यात आली आहे, असेही सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
कचरा व्यवस्थापनाच्या प्रश्नावर एमआयडीसीशी चर्चा झाली असून कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही करण्यात आली आहे. प्रकल्प उभारणीचे काम पुढे नेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकल्पाला काही कालावधी लागतो; मात्र कचरा व्यवस्थापनाचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी स्पष्ट केले.
चाकण परिसरातील रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न तातडीने सोडविण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, ३१ऑगस्टपर्यंत खड्डे बुजविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले आहेत. रस्त्यांची दुरुस्ती, वाहतूक कोंडीची ठिकाणे आणि वाहतूक व्यवस्थापन याबाबतही प्राधान्याने कार्यवाही करण्यात येत आहे.
चाकण परिसरातील पार्किंगचा प्रश्नही महत्त्वाचा आहे. उपलब्ध जागांचा योग्य वापर करून पार्किंगची व्यवस्था करण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. वाहतूक सुरळीत राहण्यासाठी रस्ते, पार्किंग आणि वाहतूक व्यवस्थापन या सर्व बाबींचा एकत्रित विचार करण्याची गरज असल्याचेही सुनेत्रा पवार म्हणाल्या.
