चिपळूण : राज्य उत्पादन शुल्क विभागाने चिपळूण तालुक्यात अवैध हातभट्टी दारू निर्मितीविरोधात धडक कारवाई करत दोन ठिकाणी छापे टाकून एकूण रु. 1,06,450 किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत दोन जणांविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले असून मोठ्या प्रमाणात हातभट्टी दारू, रसायन आणि दारू निर्मितीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.
यामध्ये मौजे रावळगाव, शिंदेवाडी येथील गुरुनाथ सहदेव हळदणकर यांच्या राहत्या घरामागील जंगल परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून सुमारे 1,200 लिटर रसायन, 105 लिटर हातभट्टी गावठी दारू आणि दारू निर्मितीचे साहित्य असा रु. 65,950 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी गुरुनाथ सहदेव हळदणकर (रा. रावळगाव) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
दुसरी कारवाई मौजे मजरेकाशी गावाच्या हद्दीत वाशिष्ठी नदीकिनारी सुरू असलेल्या हातभट्टी दारू निर्मिती केंद्रावर छापा टाकून 900 लिटर रसायन, 40 लिटर हातभट्टी गावठी दारू तसेच दारू निर्मितीचे साहित्य असा रु. 40,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी प्रवीण प्रभाकर पेडणेकर (रा. मजरेकाशी) यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त डॉ. राजेश देशमुख, सह आयुक्त (अंमलबजावणी व दक्षता) प्रसाद सुर्वे, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर, अधीक्षक किर्ती शेडगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक सुनिल आरडेकर, दुय्यम निरीक्षक संजय मालुसरे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक अर्शद शेख, जवान वैभव सोनावले, शुभम काडापुरे आणि मयूर पुरीबुवा यांनी केली. या दोन्ही गुन्ह्यांचा पुढील तपास निरीक्षक सुनिल आरडेकर करीत आहेत.