दापोलीः-दापोलीचे माजी सभापती श्री राजेश गुजर व वनविभागाच्या सहकार्याने दापोली तालुक्यातील भाटघर, मुगीज परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये विविध झाडांची लागवड केली आहे.
वन विभागाकडून वृक्षतोडीस परवानगी देताना त्याच प्रमाणात वृक्षलागवड करण्याचा महत्त्वपूर्ण निकष ठरवण्यात आला आहे. मात्र, शासनाच्या या नियमांची अंमलबजावणी अनेकदा कागदोपत्रीच राहते. वृक्षतोडीतून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक मोबदला देखील मिळाला, मात्र मिळालेल्या आर्थिक फायद्यावरच समाधान न मानता दापोली तालुक्याचे वनाच्छादन अबाधित राहावे, जैवविविधतेचे संवर्धन व्हावे आणि भविष्यातील पिढयांसाठी हिरवाई टिकून राहावी, या उद्देशाने माजी सभापती श्री. राजेश गुजर यांच्या पुढाकाराने व वनविभागाच्या सहकार्याने शेतकऱ्यांनी यावर्षाच्या पावसाळ्यात पर्यायी वृक्षलागवडीचा निर्णय घेतला. काहीवेळा वृक्षतोड अपरिहार्य ठरली, तरी त्या बदल्यात निसर्गाला पुन्हा काहीतरी देण्याची जबाबदारीही आपलीच आहे. हा अत्यंत संवेदनशील आणि पर्यावरणपूरक संदेश त्यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.
भाटघर येथील शेतकरी राजेंद्र गिरासे, मुगीज येथील शेतकरी शारदा खळे, श्रीरंग खळे, रविंद्र जाधव, इक्बालनगर येथील शेतकरी सुहेल गैबी, वणौशी येथील शेतकरी कृष्णकांत चव्हाण, आणि हातीप येथील शेतकरी शाम गोडबोले यांनी आपल्या मालकी क्षेत्रामध्ये काजू, आंबा, खैर, साग यांच्यासह विविध जंगली वृक्षांची लागवड केली आहे. या सर्व शेतकऱ्यांना प्रगतशील शेतकरी राजन खानविलकर यांनी मार्गदर्शन केले असून वनविभागाने या शेतकऱ्यांना वृक्ष लागवडीसाठी सहकार्य केले आहे.
फोटो डिपी 25-05 मुगीज येथे वृक्षलागवड करताना शेतकरी शारदा खळे