देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर रस्त्यावर दख्खन ते आंबा घाटात गाडी अडवून, गाडीतून उतरवत, चाकूचा धाक दाखवत दमदाटी व शिवीगाळ करत गाडीतील २५ हजार रुपये जबरदस्तीने लुटल्याप्रकरणी आरोपींना देवरुख पोलिसांनी अवघ्या दोन तासांत पाच आरोपींना जेरबंद केले असून तीन जण फरार असून त्यांचा कसून शोध सुरू आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रथमेश तानाजी दळवी (रा. शाहुवाडी, कोल्हापूर) हे त्यांच्या ताब्यातील बोलेरो गाडीतून वेतोशी (ता. जि. रत्नागिरी) येथून सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास एक म्हैस भरून रत्नागिरी ते कोल्हापूर असा शिराळा, सांगली येथे घेऊन जात होते. आंबा घाट, दख्खन येथे आले असता पाठीमागील काचेवर ‘पांडुरंग’ लिहिलेली थार गाडी (क्रमांक एम.एच. ०८/२७६७) व ‘भारत सरकार’ असा स्टीकर असलेली इनोव्हा गाडी (क्रमांक एम.एच. ०८/२०९९) यामधून आलेल्या आठ अनोळखी इसमांनी फिर्यादीच्या गाडीसमोर व मागे गाड्या लावून फिर्यादीला गाडीतून खाली उतरवून मारहाण व शिवीगाळ केली. तसेच चाकूचा धाक दाखवून त्यांना इनोव्हा गाडीत जबरदस्तीने बसवून गंद्रे पेट्रोल पंप, साखरपा येथे आणले व अर्ध्या वाटेत उतरवून पोबारा केला.

तसेच दमदाटी करून “पोलीसांना काही सांगितले तर याद राख” अशी धमकी देत त्यांच्या कडून ५०,००० रुपयांची मागणी केली व त्यांच्या गाडीच्या केबिनमध्ये ठेवलेले २५,००० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. तसेच “पोलीसांत तक्रार केली तर तुला सोडणार नाही” अशी धमकी दिली.

फिर्यादी यांनी साखरपा पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रारीवरून गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने तपास करून पाच आरोपींच्या मुसक्या आवळत अटक करण्यात आली.

देवरुख पोलीस ठाणे गुन्हा रजि. नं. ४७/२०२६ भा.न्या. संहिता अधिनियम २०२३ चे कलम ३०९(४), ३१०(१), २०४, ११२, १४०(२), १२७(२), ११५(२), ३५१(४) अन्वये दि. ०९/०४/२०२६ रोजी ८ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन नितीन बगाटे (पोलीस अधीक्षक, रत्नागिरी) व बी. बी. महामुनी (अपर पोलीस अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली सुरेश कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा) व उदय झावरे (पोलीस निरीक्षक, देवरुख) यांनी तपास पथके तयार करून गुन्ह्यातील आरोपी फरहान रशिद मुल्ला (वय ४२, रा. कोकण नगर, रत्नागिरी), प्रथमेश सचिन भाटकर (वय २४, रा. गोळप, रत्नागिरी), सर्वेश सुभाष किर (वय २२, रा. सोमेश्वर किरबाग, रत्नागिरी), धर्मलिंगम विजयकुमार नाडर (वय २६, रा. कुवारबांव, रत्नागिरी), भुषण बिपेंद्र सावंत (वय २६, रा. मिर्या, भारतीय शिपयार्डजवळ, रत्नागिरी) अशा एकूण ५ आरोपींना तात्काळ अटक केली आहे. उर्वरित फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

सदरची कामगिरी नितीन बगाटे (पोलीस अधीक्षक, रत्नागिरी), बी. बी. महामुनी (अपर पोलीस अधीक्षक) व सुरेश भट कदम (उपविभागीय पोलीस अधिकारी, लांजा) यांच्या मार्गदर्शनाखाली उदय झावरे (पोलीस निरीक्षक), पोउनि प्रमोद वाघाटे, सपोफौ/११६७ शांताराम पेंदेरे, पोहेकॉ/४९ प्रशांत मसुरकर, पोहेकॉ/१४३० सचिन कामेरकर, पोहेकॉ/१०२७ नितीन जाधव, पोकॉ/७३५ प्रशांत साळुंखे, पोकॉ/७९३ अमर सुतार, मपाकॉ/६८६ रेश्मा चव्हाण यांनी केली.