लांजा : शहरात गॅस दोन दिवसांत मिळत होता. परंतु आता पाहता महिना झाला तरी गॅस मिळत नाही. नागरिकांत नाराजी असून गॅससाठी लांबलचक रांगा लागत आहेत.

शासनाकडे गॅसचा साठा मुबलक आहे, ग्राहकांनी घाबरण्याचे कारण नाही, असे सांगितले जाते. पण प्रत्यक्षात ग्राहकांना गॅस मिळत नाही. एचपी गॅसबाबत जनतेत नाराजी आहे. केंद्र शासनाने पूर्वी गॅस सवलतीत देण्याची घोषणा केली होती, परंतु त्याचा काहीच पत्ता नाही. तसेच महिलांना वर्षाला काही गॅस मोफत दिला जाईल, असेही सांगितले होते; मात्र आजपर्यंत कुणालाही गॅस मोफत दिलेला नाही. ५०० रुपयांत मिळणारा गॅस ११०० रुपयांवर गेला असून तोही आता बंद होणार का, अशी चर्चा जनतेत होत आहे. या गॅसमुळे शेतकऱ्यांनी आपल्या घरातील चुली बंद केल्या होत्या. आता पुन्हा चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे.

गोरगरिबांना रेशनिंग दुकानावर धान्य मोफत देण्याची घोषणा करून त्याची अंमलबजावणी करण्यात आली. त्यामुळे शेतकरी आळशी बनले व त्यांनी शेती करणे बंद केले, असेही बोलले जात आहे. रेशनवर प्रति माणशी ३ किलो तांदूळ व २ किलो गहू देण्यात येत आहेत. आता काही देशांमध्ये युद्ध सुरू असल्याने महागाई वाढणारच. बाहेरून येणारे धान्य बंद झाले तर जनता काय खाणार, असे प्रश्न उपस्थित होत आहेत. आता नवीन पिढीला शेती करण्याची माहितीही नसल्याने अशा परिस्थितीत माणसांनी जगायचे कसे, असा सवाल उपस्थित होत आहे.

प्रशासनाकडे गॅस उपलब्ध असल्याचे सांगितले जात असले, तरी ग्राहकांना गॅस का मिळत नाही? दोन दिवसांत मिळणारा गॅस मिळण्यासाठी आता महिना उलटला आहे; अजून किती दिवस प्रतीक्षा करावी लागणार, याची चौकशी होणार का, असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.