चिपळुण : महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचा १६६ वा वर्धापन दिन ‘एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम हॉस्पिटल’ येथे उत्साहात साजरा झाला. महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या १६६ व्या वर्धापन दिनानिमित्त ‘एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय व परशुराम हॉस्पिटल’ येथे अत्यंत उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. संस्थेच्या दीर्घ व समृद्ध वाटचालीचा गौरव करत उपस्थितांनी आपल्या मनोगतातून संस्थेप्रती कृतज्ञता व्यक्त केली.कार्यक्रमाची सुरुवात भगवान धन्वंतरी पूजन आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या संस्थापकांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.
या प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून एम इ एस आयुर्वेद महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थिनी तथा सध्या पोलादपूर फिरते पथक (Mobile Unit) येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. दिव्या सोनवणे आणि पोलादपूरचे माजी तालुका आरोग्य अधिकारी (EX THO) डॉ. गुलाब सोनवणे यांची विशेष उपस्थिती होती.
प्रमुख पाहुण्यांनी आपल्या मनोगतात महाविद्यालयातील शिक्षणाचा वारसा, ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचे महत्त्व आणि वैद्यकीय क्षेत्रातील अनुभव याबाबत उपस्थितांना मार्गदर्शन केले. संस्थेच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या संस्थापकांचे स्मरण करत त्यांनी संस्थेच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमात डॉ. अलमान सर यांनी परशुराम हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या आजवरच्या प्रगतीचा आढावा सादर केला. तसेच आगामी वर्षासाठी हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटरच्या नियोजित उपक्रमांची व विकासाच्या योजनांची सविस्तर माहिती त्यांनी उपस्थितांसमोर मांडली.यानंतर डॉ.उत्पात सर यांनी उपस्थितांना संबोधित करताना वर्धापन दिनानिमित्त एम इ एस आयुर्वेद महाविद्यालय तसेच परशुराम हॉस्पिटलमधील सर्व अधिकारी, प्राध्यापक, वैद्यकीय कर्मचारी व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन व शुभेच्छा व्यक्त केल्या. संस्थेची ध्येये व आदर्श पुढे नेत सर्वांनी अधिक जोमाने कार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.
कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वर्ग, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी परिश्रम घेतले.