मुंबई–गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामावरून रायगडमध्ये पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापले आहे. महामार्गाचे काम तब्बल 95 टक्के पूर्ण झाल्याचा दावा करणाऱ्यांना मनसेचे रोहा तालुकाध्यक्ष साईनाथ धुळे यांनी चांगलेच सुनावले आहे. प्रत्यक्षात नागोठणे परिसरासह महामार्गाच्या अनेक भागांत जीवघेणे खड्डे, अपूर्ण कामे आणि वाहतुकीच्या गंभीर समस्या असताना 95 टक्के काम पूर्ण झाल्याचे सांगणे म्हणजे जमिनीवरील वास्तवाकडे डोळेझाक असल्याची टीका धुळे यांनी केली.

भाजप नेते वैभव खेडेकर यांच्या भूमिकेवरही साईनाथ धुळे यांनी निशाणा साधत, महामार्गाची प्रत्यक्ष परिस्थिती एकदा रस्त्यावर उतरून पाहावी, असा टोला लगावला.

दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या रायगड दौऱ्याने काहींच्या पोटदुखीला सुरुवात झाली आहे, अशी बोचरी टीकाही साईनाथ धुळे यांनी केली. राज ठाकरे यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नागोठणे–रोहा परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेचा मुद्दा मनसेकडून आक्रमकपणे उपस्थित केला जात आहे.

नागोठणे परिसरात महामार्गाची दयनीय अवस्था -नागोठणे परिसरात मुंबई–गोवा महामार्गाची अवस्था अत्यंत खराब झाली असून, नागोठणेजवळील एक ब्रिज वाहतुकीसाठी बंद असल्याने वाहनचालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यातच महामार्गावर ठिकठिकाणी पडलेले मोठमोठे खड्डे अपघातांना आमंत्रण देत आहेत.

महामार्गावरील काही ठिकाणी करण्यात आलेल्या कामाच्या दर्जावरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत असून, ढिसाळ पद्धतीने पेव्हर ब्लॉकचा वापर करण्यात आल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे.