मुंबई : वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि आरएसएस Rashtriya Swayamsevak Sangh यांच्यावर अत्यंत आक्रमक शब्दांत टीका करत केलेल्या ट्विटमुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे.

ॲड. आंबेडकर यांनी आपल्या ट्विटमध्ये व्यंगात्मक शैलीत मोदी आणि आरएसएस यांच्यातील संवाद मांडत केंद्र सरकारच्या धोरणांवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांनी मांडलेला संवाद असा आहे—

“मोदी – मी अमेरिकेचा गुलाम बनेन!
आरएसएस – बना!

मोदी – मी अमेरिकेच्या तालावर मुजरा करीन!
आरएसएस – करा!

मोदी – मी अमेरिकेच्या सांगण्यावरून सोर्स कोड नसलेले महागडे राफेल खरेदी करीन!
आरएसएस – खरेदी करा!

मोदी – मी अमेरिकेसमोर नतमस्तक होईन, देश विकून टाकीन, लोकांना फसवीन; पण तुम्ही फक्त देशप्रेमी असल्याचा ढोंग करत राहा आणि काही बोलू नका!

आरएसएस – काही अडचण नाही. आम्ही यात माहिर आहोत!”

या संवादाच्या माध्यमातून आंबेडकर यांनी मोदी सरकार अमेरिकेच्या प्रभावाखाली काम करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच आरएसएस या घडामोडींवर मौन बाळगून अप्रत्यक्ष पाठिंबा देत असल्याची टीकाही त्यांनी केली आहे.

भूतकाळाचा संदर्भ देत त्यांनी स्वातंत्र्य लढ्यातील आरएसएसच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, “देश पुन्हा गुलामगिरीकडे ढकलला जात आहे,” असा आरोप करत त्यांनी ही परिस्थिती “देशद्रोही कृत्य” असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या पार्श्वभूमीवर २३ मार्च रोजी नागपूर येथे आरएसएसविरोधात आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे.

या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असून, आगामी काळात या मुद्द्यावरून राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत आहेत.