मुंबई : वंदनीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या पुण्यतिथीदिनी राहुल गांधी, सोनिया गांधी त्यांना आदरांजली अर्पण करतील, किमान तसे ट्विट करतील, अशी अपेक्षा होती. परंतु राहुल गांधींनी श्रद्धांजली अर्पण केली नाही, सोनिया गांधींनीही केली नाही, ना काँग्रेसच्या एका नेत्याने केली. याचा अर्थ, काँग्रेस आणि राहुल गांधींच्या मनात हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल द्वेष आहे. असे असताना सातत्याने राहुल गांधींचा अजेंडा पुढे न्यायचे काम संजय राऊत यांच्याकडून केले जाते. अजून काँग्रेसची किती गुलामी करणार आहेत, या प्रश्नाचे उत्तर महाराष्ट्राला हवे आहे, अशी टीका भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी बुधवारी केली. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संजय राऊत म्हणतात की, बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली नाही म्हणून बाळासाहेबांचे महत्त्व कमी होत नाही. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे महत्त्व कुणीही कमी करू शकत नाही. तुम्ही इंदिरा गांधींची, राजीव गांधींची जयंती साजरी करता, तुम्ही काँग्रेसच्या नेत्यांना श्रद्धांजली अर्पण करता, त्यांना आदरांजली अर्पण करता. परंतु तुम्ही ज्यांची गुलामी करता, चमचेगिरी करता आणि स्वार्थासाठी ज्यांच्या मांडीला मांडी लावून बसलात, त्या राहुल गांधींनी तुम्हाला कवडीची किंमत दिलेली नाही, असे श्री. बन म्हणाले.
श्री. बन पुढे म्हणाले, देशाची आर्थिक व्यवस्था कोलमडल्याची टीका करणाऱ्या राहुल गांधी आणि संजय राऊत यांनी आधी देशातील आर्थिक व्यवहारांकडे डोळे उघडून पाहावे. यंदाच्या दिवाळीत देशात तब्बल सात लाख कोटी रुपयांची खरेदी झाली असून, सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. त्यामुळे अर्थव्यवस्था उध्वस्त झाल्याचा दावा करणाऱ्यांनी वास्तव समजून घ्यावे, अशा शब्दांत श्री. बन यांनी संजय राऊत यांच्यावर टीका केली. संजय राऊत अर्थशास्त्री नसून कामशास्त्री आहेत, अशी बोचरी टिप्पणीही त्यांनी केली. दिवाळीत झालेली ही खरेदी पाकिस्तान किंवा बांगलादेशातून आलेल्या नागरिकांनी केली नव्हती. सर्वसामान्य भारतीय नागरिकांनीच बाजारपेठेत खरेदी केली आहे. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळात भारताची अर्थव्यवस्था जगात तेराव्या-चौदाव्या क्रमांकावर होती. मात्र, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताची अर्थव्यवस्था जगातील चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे, असे श्री बन यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रप्रमुखांच्या रांगेमध्ये तिरंगा पायाखाली तुडवला जाऊ शकतो, हे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या लक्षात येताच प्रसंगावधान दाखवत त्यांनी तिरंगा उचलला. तिरंगा पायदळी तुडवू दिला नाही. संजय राऊत, तिरंग्याचा अपमान करणे, भारताचा अपमान करणे आणि पाकिस्तानचा उदोउदो करणे, ही तुमची आणि राहुल गांधींची सवय आहे. राहिला प्रश्न कार्यालयावर तिरंगा फडकवला का नाही? संजय राऊत, 26 जानेवारी 2002 पूर्वी कुठल्याही खासगी कार्यालयावर तिरंगा फडकवता येत नव्हता. अटलजींचे सरकार आल्यानंतर काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या माध्यमातून खासगी घरांवर, खासगी कार्यालयांवर तिरंगा फडकवता आला. त्याआधी 50 वर्षे तुमच्या घरावर आणि सामना कार्यालयावरही तिरंगा फडकवला नव्हता. कारण सर्वसामान्य नागरिकांना काँग्रेसने तिरंगाही फडकवू दिला नव्हता. तुम्ही रोज उठता आणि 50 वर्षे भाजपाने तिरंगा फडकवला नाही, संघाने तिरंगा फडकवला नाही म्हणून ओरड करता. याच्याबद्दल तुम्ही काँग्रेसला जाब विचारला पाहिजे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात ‘हर घर तिरंगा’ अभियान सुरू आहे. तुम्ही मात्र ‘हर घर वसुली’ एवढेच अभियान राबवता, असे श्री. बन यांनी सुनावले.