गुहागर : तालुक्यातील महर्षी परशुराम अभियांत्रिकी महाविद्यालय वेळणेश्वरच्या मुला-मुलींच्या टेबल टेनिस संघांनी घरडा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे आयोजित कोकण विभागीय टेबल टेनिस स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे.
मुलींच्या संघाने स्पर्धेत दमदार कामगिरी करताना पहिल्या सामन्यात ज्ञानदीप कॉलेज, खेड संघाचा ३-० असा पराभव केला. उपांत्य फेरीत गोगटे कॉलेज, रत्नागिरी विरुद्ध रंगलेल्या चुरशीच्या सामन्यात वेळणेश्वर अभियांत्रिकी संघाने ३-२ असा विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यात डिबीजे कॉलेज, चिपळूण संघाकडून पराभव झाला. त्यामुळे मुलींच्या संघाने झोनल स्पर्धेत उपविजेतेपद पटकावले.
मुलींच्या संघात महाविद्यालयातील वेदिका सकपाळ, प्रेरणा जाधव, तन्वी चव्हाण, वेदश्री चव्हाण आणि दिशा केरकर यांनी सहभाग घेतला. यातील वेदिका सकपाळ हिची कोकण विभागाच्या अंतिम ५ सदस्यीय विद्यापीठस्तरीय संघात निवड झाली आहे. हा संघ ३१ ऑगस्ट ते १ सप्टेंबर २०२६ दरम्यान NKTT कॉलेज, ठाणे येथे होणाऱ्या विद्यापीठस्तरीय स्पर्धेत सहभागी होणार आहे.
मुलांच्याही संघाने स्पर्धेच्या पहिल्या सामन्यात ज्ञानदीप कॉलेज, खेड संघाचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला. उपांत्य फेरीत गोगटे कॉलेज, रत्नागिरी संघाकडून पराभव झाला. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात लांजा कॉलेज संघाकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे मुलांच्या संघाने झोनल स्पर्धेत चौथे स्थान मिळविले.
मुलांच्या संघात राज खडपेकर, पार्थ वाजे, गौरव दळवी, सचिन पाष्टे आणि ओम यादव यांनी सहभाग घेतला. विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे राज खडपेकर याची कोकण विभागाचे विद्यापीठस्तरीय प्रतिनिधित्व करणाऱ्या संघात राखीव खेळाडू म्हणून निवड झाली आहे.
या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अविनाश पवार, विविध विभागांचे प्रमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्रा.औदुंबर पाटकर तसेच महाविद्यालयातील प्राध्यापक व कर्मचारी यांनी सर्व खेळाडूंचे अभिनंदन केले असून विद्यापीठस्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या वेदिका सकपाळ आणि राज खडपेकर यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.