मंडणगड : न्यू इंग्लिश स्कूल, तुळशी विद्यालयाच्या वतीने ‘आनंददायी शनिवार’ उपक्रमांतर्गत तुळशी येथील श्री. भैरवनाथ मंदिर परिसरात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. श्रद्धा नटे यांच्या अध्यक्षतेखाली हा उपक्रम उत्साहात पार पडला.
विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव, श्रमदानाची आवड तसेच धार्मिक व ऐतिहासिक स्थळांबद्दल आदर निर्माण व्हावा, या उद्देशाने हे अभियान आयोजित करण्यात आले होते. परिपाठानंतर मुख्याध्यापिका श्रद्धा नटे यांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व पटवून दिले. त्यानंतर विद्यार्थी व शिक्षकांनी हातात झाडू तसेच आवश्यक साहित्य घेऊन मंदिर परिसरात स्वच्छता केली.
यावेळी मंदिराचा सभामंडप, बाहेरील प्रांगण तसेच परिसरातील रस्त्यांवर साचलेला पालापाचोळा, निर्माल्य व इतर कचरा विद्यार्थ्यांनी एकत्र केला. ग्रामस्थांच्या सहकार्याने संकलित कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्यात आली.
स्वच्छता अभियानानंतर विद्यार्थ्यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’ आणि ‘सुंदर गाव, माझे गाव’ अशा घोषवाक्यांतून स्वच्छतेबाबत जनजागृती केली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना सामाजिक दायित्व, श्रमप्रतिष्ठा आणि सार्वजनिक परिसर स्वच्छ ठेवण्याचे महत्त्व अनुभवातून शिकता आले. या उपक्रमासाठी विद्यालयातील शिक्षक सुरेश कोतवाल, भरत गोताड, शिक्षकेतर कर्मचारी कैलास धाडवे, संदेश पारधी तसेच विद्यार्थी उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी राबविलेल्या या उपक्रमाचे ग्रामस्थांनी कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले.
फोटो ओळी
मंदिर परिसरात स्वच्छता करताना प्रशालेतील विद्यार्थी
तुळशीतील भैरवनाथ मंदिर परिसरात विद्यार्थ्यांचे स्वच्छता अभियान
