लांजा : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे लांजा तालुकाप्रमुख युवराज हांदे यांच्या नेतृत्वाखाली पदाधिकाऱ्यांनी आज लांजा गटविकास अधिकाऱ्यांची भेट घेऊन तालुक्यातील प्रलंबित विकासकामे व नागरिकांच्या प्रश्नांवर प्रशासनाला जाब विचारला. केवळ आश्वासने न देता संबंधित कामांना मुदतबद्ध गती देऊन प्रत्यक्ष कार्यवाही करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
लांजा पंचायत समितीची नवीन इमारत गेल्या चार वर्षांपासून अपूर्ण आहे. त्यामुळे तिचे बांधकाम तातडीने पूर्ण करून इमारत कार्यान्वित करावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली. ग्रामीण रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे रखडलेले काम वेगाने पूर्ण करावे, तसेच तालुक्यातील जिल्हा परिषद बांधकामांची गुणवत्ता तपासून निकृष्ट कामांवर संबंधित ठेकेदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.
नादुरुस्त इमारतींमध्ये भरवल्या जाणाऱ्या अंगणवाड्यांसाठी सुरक्षित व सुस्थितीतील इमारती उपलब्ध करून द्याव्यात, खासगी जागेत भरणाऱ्या अंगणवाड्यांना कायमस्वरूपी स्वतःची जागा मिळवून द्यावी, अशी मागणीही करण्यात आली.
मागील वर्षीच्या ओल्या दुष्काळातील पीकविमा व नुकसानभरपाईपासून वंचित शेतकऱ्यांना तातडीने प्रलंबित भरपाई मिळवून द्यावी, तसेच जलजीवन मिशन व ग्रामीण पाणीपुरवठ्याची अपूर्ण कामे त्वरित पूर्ण करून प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू करावा, अशी मागणी करण्यात आली. घरकुल योजनेतील पात्र लाभार्थ्यांची फेरतपासणी करून वंचित पात्र लाभार्थ्यांना तातडीने घरकुल मंजूर करावे, अशीही मागणी करण्यात आली.
२०२४ मधील लंपी आजारामुळे जनावरे दगावलेल्या ज्या पशुपालकांना अद्याप नुकसानभरपाई मिळालेली नाही, त्यांना प्रलंबित भरपाई त्वरित अदा करावी, अशी मागणी करण्यात आली. त्याचबरोबर आरोग्य विभागातील ५० टक्क्यांहून अधिक रिक्त पदे तातडीने भरून ग्रामीण भागातील आरोग्यसेवा सक्षम करावी, अशी मागणी प्रशासनाकडे करण्यात आली.
तालुक्यातील या प्रश्नांवर ठोस निर्णय, प्रत्यक्ष कार्यवाही आणि प्रलंबित कामांना कालमर्यादा निश्चित करण्याची मागणी युवराज हांदे व पदाधिकाऱ्यांनी केली. त्यामुळे प्रशासन आता या प्रश्नांवर काय कार्यवाही करते, याकडे लांजावासीयांचे लक्ष लागले आहे.
यावेळी युवासेना तालुका अधिकारी अभि राजेशिर्के, माजी उपसभापती सुभाष रामाने, विभागप्रमुख विश्वास मांडवकर, उपविभागप्रमुख अल्लाउद्दीन नेवरेकर, शांताराम गुरव, संजीवकुमार राऊत, राजेंद्र सुर्वे, विभाग संघटिका आसावरी मांडवकर, बाबा धावणे, बेर्डे सर, विभाग संघटक पंढरी गुरव, भाई राईन, श्रीराम नाना जाधव, महेंद्र राऊत, आप्पा जाधव, देवेंद्र वालकर, किशोर मांडवकर, तसेच आसगे येथील युवक मंडळीतील संजय सुवारे, श्री इंगळे, धर्मेंद्र पाल्ये, आणि सर्व खातेनिहाय प्रमुख उपस्थित होते. सर्वांनी चर्चेत सक्रिय सहभाग घेतला.
