चिपळूण : परशुराम ग्रामीण आरोग्य विकास अभियान-२०२६ अंतर्गत परशुराम येथील एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. लोटे येथील महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी पुणे संचालित परशुराम हॉस्पिटलच्या वतीने आयोजित या शिबिरात एकूण ९९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कर्मचाऱ्यांचे आरोग्य चांगले राहावे तसेच संभाव्य आजारांचे वेळीच निदान व्हावे, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात रक्तदाब, रक्तातील साखर, वजन, उंची यांसह विविध प्राथमिक आरोग्य तपासण्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे, ४४ महिला कर्मचाऱ्यांची iBreastExam द्वारे स्तन तपासणी, तर ६ जणांची PFT (Pulmonary Function Test) द्वारे फुफ्फुसांची कार्यक्षमता तपासणी करण्यात आली. अत्याधुनिक तपासणी सुविधांमुळे शिबिराला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी परशुराम हॉस्पिटलचे उपअधीक्षक डॉ. अनुपम अलमान, डॉ. अनमोल बेलवलकर, डॉ मुग्धा बेलवलकरडॉ. विनोद गिर, नर्सिंग कॉलेजचे **श्री. लिंगराजू, नर्सिंग स्टाफ तसेच जनसंपर्क अधिकारी सुश्मिता पाटील उपस्थित होते. एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या आरती खाडिलकर यांच्यासह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी व अध्यापक यांनीही आरोग्य तपासणी प्रक्रियेत सक्रिय सहभाग घेतला. सदर उपक्रम अमनोरा येस फाउंडेशन पुणे यांच्या सहकार्याने राबवण्यात येत आहे.
या आरोग्य शिबिराच्या माध्यमातून कर्मचाऱ्यांमध्ये नियमित आरोग्य तपासणी, प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा आणि जीवनशैलीविषयक आरोग्यजागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. विशेषतः महिलांसाठी करण्यात आलेल्या स्तन तपासणीमुळे स्तनांच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढण्यास मदत झाली.
या उपक्रमानंतर पुढील आठवड्यात शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी CPR (Cardiopulmonary Resuscitation) प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीत हृदयक्रिया बंद पडल्यास किंवा श्वसनास अडथळा निर्माण झाल्यास तातडीने करावयाच्या जीवरक्षक उपायांचे प्रशिक्षण यावेळी देण्यात येणार आहे.
परशुराम ग्रामीण आरोग्य विकास अभियान हे केवळ एकदिवसीय आरोग्य शिबिरापुरते मर्यादित नसून शाळा, शासकीय कार्यालये, बँका, विविध संस्था आणि ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत प्रतिबंधात्मक व गुणवत्तापूर्ण आरोग्यसेवा पोहोचविण्याचा व्यापक उपक्रम आहे. या अभियानांतर्गत नियमित आरोग्य तपासणी, आरोग्य शिक्षण, जीवनशैली सुधारणा मार्गदर्शन तसेच आपत्कालीन वैद्यकीय प्रशिक्षण असे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
शिबिरास मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल एसपीएम इंग्लिश मीडियम स्कूलच्या वतीने परशुराम रुग्णालयाच्या वैद्यकीय पथकाचे आभार मानण्यात आले. भविष्यातही अशा प्रकारची आरोग्य तपासणी शिबिरे नियमितपणे आयोजित करण्यात यावीत, अशी अपेक्षा शाळेच्या वतीने व्यक्त करण्यात आली.
संपर्क
सौ सुश्मिता पाटील – ७७७५९७२४४१
श्री संजय आंब्रे – ९७९७९७७०१८
