रत्नागिरी : दिव्यांगांना सन्मानाने जगता यावे आणि त्यांना आवश्यक सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रशासनाने संवेदनशीलतेने काम करावे. माझ्या जिल्ह्यातील दिव्यांग बांधवांना व भगिनींना काहीही कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी दिली.
जिल्हा नियोजन समिती सभागृहात राष्ट्रीय भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रमांतर्गत ई-फेरफार वापरकर्त्यांना लॅपटॉप व प्रिंटर वितरण तसेच दिव्यांगांना सहाय्यक उपकरणांचे मोफत वाटप पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा परिषद अध्यक्षा अस्मिता केंद्रे, नगराध्यक्ष शिल्पा सुर्वे, अपर जिल्हाधिकारी भाऊ गलांडे, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी, जि. प. उपाध्यक्ष विलास चाळके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परीक्षित यादव, जि. प. सदस्य बाबू म्हाप, बंड्या साळवी आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना डॉ. सामंत म्हणाले, “आजचा कार्यक्रम भावनिक आहे. प्रत्येक नगरपालिकांमध्ये दिव्यांगांसाठी ५ टक्के निधी उपलब्ध आहे. ४० ते ६० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना १२ हजार, ६० ते ८० टक्के असलेल्यांना १४ हजार आणि ८० ते १०० टक्के दिव्यांगत्व असलेल्या लाभार्थ्यांना १६ हजार रुपये थेट त्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत.” या निधीतून दिव्यांगांना आवश्यक साहित्य घेता यावे, यासाठी हा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले. पुढील शनिवारी सकाळी १० ते १२ या वेळेत जिल्हा शासकीय रुग्णालयात दिव्यांगांच्या समस्यांचा आढावा घेणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले. दिव्यांगांवर अन्याय झाल्यास कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.
तसेच जिल्ह्यातील विधवा, परित्यक्ता आणि एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना जिल्हा नियोजनातून लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
