चिपळूण : कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्था, कोकण प्रांत आयोजित पारंपरिक ‘तेलपोळी’ प्रात्यक्षिक उपक्रम नुकताच संपन्न झाला. कृषी पर्यटन केंद्रे आणि कोकणातील आदरातिथ्य व्यवसायामध्ये या पारंपरिक मेजवानीचा समावेश व्हावा आणि ती सहज उपलब्ध व्हावी, या उद्देशाने कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेतर्फे विशेष प्रात्यक्षिकाचे आयोजन करण्यात आले होते.

दिनांक २४ मार्च २०२६ रोजी सकाळी ११ ते ३ या वेळेत, वेगवेगळ्या सत्रांमध्ये कोकणभूमी कृषी पर्यटन सहकारी संस्थेच्या कार्यालयात, ओकस अकॅडमी, परशुराम नगर, चिपळूण येथे कार्यक्रम संपन्न झाला. सुरुवातीला संस्थेच्या अध्यक्षा डॉ. मीनल ओक यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रस्तावना मांडली. पाकशास्त्रामध्ये प्रवीण असलेल्या, ग्लोबल कोकण चिपळूण पर्यटन मल्टीपर्पज संस्थेच्या संचालिका सौ. लक्ष्मी कैलास रेडीज यांच्या हस्ते मार्गदर्शिका, अभिनेत्री व निवेदिका सौ. रुपाली आनंद पाथरे (पुणे) यांचा भेटवस्तू व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

रुपाली यांनी तेलपोळीचे प्रात्यक्षिक सादर करून उपस्थितांना पदार्थाचे घटक, प्रमाण व कृती समजावून सांगितली. या उपक्रमामध्ये केटरिंग सेवा, स्नॅक्स व भाजी-पोळी केंद्र तसेच जेवणाचे डबे देणाऱ्या महिला सहभागी झाल्या होत्या. सोळा महिलांनी प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करून तेलपोळी तयार करण्याचा अनुभव घेतला, तर इतर उपस्थितांनी प्रात्यक्षिक पाहिले. दृकश्राव्य माध्यमातूनही तेलपोळी बनवण्याची प्रक्रिया सादर करण्यात आली. तेलपोळी लाटण्यासाठी वेगळ्या, पातळ पत्र्याची आवश्यकता असते.

महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीमध्ये पुरणपोळी जितकी लोकप्रिय आहे, तितकाच वैशिष्ट्यपूर्ण आणि चविष्ट असा ‘तेलपोळी’ हा गोड पदार्थ करून दाखवण्यात आला. चणाडाळ आणि साखरेचे मऊ सारण (पुरण) भरून, तेलाच्या साहाय्याने कागदासारखी पातळ लाटलेली आणि कुरकुरीत भाजलेली ही तेलपोळी जिभेवर रेंगाळणारी चव देणारी ठरली. उपस्थित सर्वांनी तेलपोळीचा आस्वाद घेतला. कार्यक्रम उत्तमरीत्या संपन्न झाला.