खोपोली : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान असलेल्या आई एकवीरा देवीची चैत्र पालखी यात्रा संपन्न झाल्यानंतर, रात्री उशिरा सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास पायथा मंदिरासमोर भाविकांच्या दोन गटांमध्ये पालखी पुढे नेण्याच्या किरकोळ कारणावरून तुफानी दगडफेक व हाणामारी झाली. कल्याण कोळीवाडा व पनवेल कोळीवाडा या दोन गटांमध्ये ही घटना घडली.
मागील काही वर्षांपासून या दोन गटांमध्ये वैयक्तिक वाद आहेत. या वादाचे पुनरुज्जीवन यंदा पालखी संपन्न झाल्यानंतर, पायथा मंदिरासमोर दोन्ही पालख्या व गट समोरासमोर आल्यानंतर झाले आणि त्यातून हाणामारी झाली.
दोन गटांमध्ये झालेल्या तुफानी हाणामारीची माहिती मिळाल्यानंतर पोलीस प्रशासन व स्थानिक नागरिकांनी हस्तक्षेप करून वाद शांत केला. मात्र, सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास पुन्हा या दोन गटांमध्ये तुफानी दगडफेक व हाणामारी झाली. यामध्ये काही तरुण किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू असून, या दोन्ही गटांवर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, अशी माहिती पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांनी दिली.
दिनेश तायडे म्हणाले की, या दगडफेक व हाणामारीचा यात्रा, पालखी किंवा देवस्थानाशी कोणताही संबंध नाही. दोन गटांमधील पूर्वीपासूनच्या वैमनस्यातून हे वाद झाले आहेत. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असून, सध्या परिसरात शांतता आहे. भाविकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत दर्शन घ्यावे. बंदोबस्तासाठी पोलिसांचा तगडा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
रायगड भागातील तसेच मुंबई व आजूबाजूच्या परिसरांतून मोठ्या प्रमाणात कोळी-आगरी बांधवांच्या पालख्या आई एकवीरा देवीच्या चैत्र यात्रेसाठी गडावर येत असतात. अनेक वेळा वैयक्तिक वादांचे पुनरुज्जीवन येथे हाणामारीत होते. यापूर्वीही अशा घटना घडल्या आहेत.
यावर्षी मागील अनेक वर्षांच्या तुलनेत भाविकांची अलोट गर्दी झाली होती. त्यानुसार पुणे ग्रामीण पोलीस दलाकडून मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. सुमारे ३०० हून अधिक पोलीस बंदोबस्तासाठी नियुक्त करण्यात आले होते. आई एकवीरा देवीच्या गडावर बुधवारी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मुख्य पालखी मिरवणूक संपन्न झाली. त्यानंतर विविध भागांतील पालख्या गडावर येत होत्या व त्यांच्या मिरवणुका शांततेत सुरू होत्या.
मात्र, रात्री उशिरा गडाखाली पायथा मंदिरासमोर कल्याण व पनवेल येथील कोळीवाड्यांतील तरुण समोरासमोर आल्यानंतर वाद निर्माण झाला. या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले व दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक सुरू केली. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, परिसरातील हार-फुल विक्रेत्यांनी दुकाने बंद ठेवली. तसेच रिक्षा व्यवसायावरही परिणाम झाला आहे. श्री एकवीरा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष दीपक हुलावळे म्हणाले की, या भांडणाचा देवस्थान किंवा पालखीशी कोणताही संबंध नाही. दोन गटांमधील वैमनस्यातूनच ही घटना घडली आहे. भाविकांनी अफवांवर विश्वास न ठेवता शांततेत दर्शन घ्यावे. भाविकांच्या सुरक्षिततेसाठी व सुलभ दर्शनासाठी देवस्थान ट्रस्ट व पोलीस प्रशासन सज्ज आहे.