खेड (प्रतिनिधी) : – भर उन्हाच्या कडाक्यात नागरिकांना अक्षरशः घामाच्या धारा सहन कराव्या लागत असताना, वीज बिल भरूनही विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार समोर येत आहेत. ऑनलाईन पद्धतीने वीज भरणा करूनही ग्राहकांना अंधारात बसावे लागत असल्याने संतापाची लाट उसळली आहे.
वेळेत आणि नियमांनुसार वीज बिल भरूनही अचानक पुरवठा खंडित करण्यात आला. प्रखर उन्हामुळे आधीच हैराण झालेल्या कर्मचाऱ्यांना अक्षरशः घाम गाळत काम करावे लागले. या प्रकारामुळे “डिजिटल इंडिया”च्या गाजावाजामागील वास्तव समोर आले आहे. विशेष म्हणजे, ऑनलाईन बिल भरल्यानंतरही संबंधित यंत्रणेत तात्काळ नोंद होत नसल्याने ग्राहकांना विनाकारण त्रास सहन करावा लागत आहे. “स्मार्ट वीज मीटर” ही सुविधा सोयीसाठी आणली असली, तरी प्रत्यक्षात तीच डोकेदुखी ठरत असल्याची तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत. बिल भरल्यानंतरही कनेक्शन तोडले जाणे म्हणजे सरळसरळ ग्राहकांची फसवणूक असल्याचा आरोप होत आहे.