मुंबई – भारत देशातील 6 हजार पेक्षा जास्त जाती, अनेक धर्म, अनेक भाषा, अनेक प्रांत विविधतेने नटलेल्या या भारत देशाला महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाद्वारे अतुट आणि अभेद्य जोडले आहे. या देशाला कोणीही तोडु शकत नाही. विविध जाती धर्मीयांना असे जोडले आहे की ही राष्ट्रीय एकात्मता कोणीही तोडु शकत नाही असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी केले.
वसई-विरार जिल्हा रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा ज्योतीबा फुले या महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव वसई येथे आयोजित करण्यात आला होता. त्यात प्रमुख अतिथी म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी जयंती सोहळयाचे आयोजक रिपब्लिकन पक्षाचे वसई – विरार जिल्हाध्यक्ष ॲड. ईश्वर धुळे; रिपाइंचे राष्ट्रीय सचिव सुरेश बारसिंग, राज्य सरचिटणीस गौतम सोनवणे, ठाणे प्रदेशाध्यक्ष अण्णा रोकडे, पालघर जिल्हाध्यक्ष सुरेश जाधव; भिवंडी जिल्हा अध्यक्ष महेंद्र गायकवाड ; देवेंद्र शेलेकर; रमेश गायकवाड आदि अनेक मान्यंवर उपस्थित होते.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची अनेक स्मारके या देशात उभी केली आहेत. येत्या दीड वर्षामध्ये मुंबईत चैत्यभुमीलगत इंदुमील येथे महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभे राहणार आहे. असे ना.रामदास आठवले यावेळी म्हणाले.
